ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Dharashiv School Headmaster Suicide News : धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. उमरगा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक तानाजी विठ्ठलराव जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिक्षक वर्गातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तानाजी जाधव यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तानाजी जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट आता पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संबंधित सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक आणि काही सहकाऱ्यांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Beed News: बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय? )
इतकेच नव्हे तर, संस्थाचालकाकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या जाचाला कंटाळूनच त्यांनी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.
या घटनेचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले असून परिसरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. विविध शिक्षक संघटनांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक 400 कोटी लूट प्रकरणाला मोठं वळण, तक्रारदारच आता पोलिसांच्या विरोधात; नेमके सत्य काय? )
एका मुख्याध्यापकाला अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलावे लागणे ही शिक्षण क्षेत्रासाठी मानहानीकारक घटना मानली जात आहे. दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून केली जात आहे.
सध्या पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुसाईड नोटची सत्यता पडताळली जात असून, त्यामध्ये नाव असलेल्या संबंधित व्यक्तींची आणि संस्थाचालकांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. या तपासानंतरच आत्महत्येचे नेमके कारण आणि त्यामागचे खरे सूत्रधार स्पष्ट होतील.