वडील आणि मुलाचं नात हे एक वेगळच नातं असतं. मुलगा हा आपल्या म्हातारपणाची काठी बनेल असं प्रत्येक बापाला मुलाबद्दल वाटतं. पण काही मुलं त्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत. उलट बापच त्यांना अडसर वाटू लागतो. त्यातून टोकाची पावलं ही उचलली जातात. अशी धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या वादातून मुलाने वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी घरात राहू नये, या कारणावरून सुरू असलेल्या भांडणाचा अखेर खूनामध्ये झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिंगा तुमड्डु पावरा वय 70 आणि त्यांचा मुलगा सुनिल सिंगा पावरा वय 30 हे दोघे बोराडी येथे एकत्र राहत होते. त्यांनी काही काळापूर्वी दोघांनी मिळून घर बांधले होते. मात्र, वडिलांनी त्या घरात राहू नये, यावरून सुनिल हा दोन दिवसांपासून सतत वडिलांशी वाद घालत होता. नेहमी प्रमाणे वडील सिंगा पावरा हे झोपेत असताना मुलगा सुनिल याने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्याच अवस्थेत त्यांना तातडीने हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सिंगा पावरा यांचा दुसरा मुलगा आमावश्या सिंगा पावरा याने पोलिसात तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुनिल सिंगा पावरा यास सांगवी पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. शिवाय पुढील तपास पोसई मिलिंद पवार करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी यावेळी दिली आहे. या घटनेनं मात्र सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.