कुणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल आणि त्यातून किती मोठा गुन्हा होईल याचा काही नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना धुळे शहरात घडली आहे. दुचाकीचा कट मारल्याच्या किरकोळ कारणावरुन एका 18 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. त्याचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर आपटून त्याचा खून करण्यात आला. धुळे शहरातील नंदीरोडवर इथं ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फैज अन्सारी हा तरुण धुळे शहरात राहातो. मच्छी बाजार परिसरातील निशांत चौकात त्याचं घर आहे. तो एका मेडीकल स्टोअर्समध्ये कामाला होता. रात्री तो आपले काम पूर्ण करून घरी निघाला होता. तो दुचाकीवरून निघाला होता. यावेळी समोरुन येणाऱ्या वाहनाला त्याचा कट लागला. त्यामुळे समोर असलेल्या दुचाकीवरिल दोघे जण भडकले त्यांनी फैज याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर पाच ते सहा वेळा आपटले.
तेवढ्यावरच ते दोघे थांबले नाहीत. त्यांनी त्याच्या छाती आणि पोटातही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण इतकी गंभीर होती की त्यात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी युवकाच्या नातेवाईकाने शहरातील चाळीसगांव रोड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवत पोलिस निरीक्षक सुरेश घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाी केली आहे.
त्यानंतर दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी फैजचे नातेवाईक मोहम्मद साजीद अब्दुस लतीफ अन्सारी यांनी चाळीसगाव रोड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अज्ञात दोन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पण येवढ्या शुल्लक कारणाने एखाद्याचा जीव घेतला गेला यामुळे हळहळ ही व्यक्त केली जात आहे.