प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार (Cyber Fraud) अनेक नवनवीन शक्कल लढवत असतात. आता 'डिजिटल अरेस्ट' (digital arrest) या एका नव्या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे एकट्या नाशिक शहरात आतापर्यंत 7 जणांची तब्बल 7 कोटी 38 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
विशेष म्हणजे या फसवणुकीला बळी पडणारे सर्वच जणं सुशिक्षित आहेत. यातील काहीजणं आय टी इंजिनियर, बँक ऑफिसर, डॉक्टर अशा क्षेत्रातील आहेत. या गुन्ह्यात उच्चशिक्षित लोकांनाच लक्ष्य केलं जात आहे. दरम्यान अशाच एका हाऊस अरेस्टच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास करण्यात आला. सायबर गुन्हेगारांनी संबंधित व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून एक तासाच्या आतच वेगवेगळ्या तब्बल 1400 बँक अकाउंटवर पैसे वळवण्यात आले आणि संबंधित अकाउंटचा बॅलन्स चक्क शून्य करण्यात आला होता. यावरूनच सायबर गुन्हेगारांचे हे जाळे, त्याची व्याप्ती नक्की कुठपर्यंत जाऊन पोहोचली असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही.
हाऊस अरेस्ट फ्रॉड म्हणजे काय?
सायबर गुन्हेगारांकडून स्काईप किंवा व्हॉटसअॅपवर व्हिडीओ कॉल केला जातो आणि ईडी, सीबीआय, नार्कोटिक्स किंवा क्राईम ब्रँचमधून आम्ही बोलत असल्याचं सांगितलं जातं. तुम्ही मनी लाँड्रिंग केली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीमध्ये तुमचा सहभाग दिसून आलाय किंवा मग तूम्ही पाठवलेल्या कुरियरमध्ये ड्रग्स आढळले आहेत असं सांगत धमकावलं जातं. तुमच्या बँक अकाउंटची किंवा इतर वैयक्तिक माहिती गुन्हेगारच तुम्हाला सांगतात. एवढंच काय तर थेट पोलीस, ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे सही शिक्के असलेले अटकेचे पत्र, सुप्रीम कोर्टाच्या अटकेच्या आदेशाच्या खोट्या प्रतही पाठवल्या जातात. व्हिडीओ कॉल कट केला तर तुम्हाला तत्काळ पोलीसांकडून अटक केली जाईल अशी भीती घातली जाते. एखादी लिंक शेअर करत किंवा एखादा बँक अकाउंट नंबर देत त्यावर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते.
नक्की वाचा - Pune Crime : पुण्यात हॉटस्पॉट दिला नाही म्हणून हत्या; भररस्त्यात चेहरा छिन्नविछिन्न होईपर्यंत ठेचला!
पोलिसांचं आवाहन...
सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार आल्यास तत्काळ सायबर गुन्हेगारांना दिलेल्या बँक अकाउंटबाबत बँकेला पत्रव्यवहार केला जातो आणि ते अकाउंट फ्रिज केला जातो. त्यामुळे अकाऊंटमधील शिल्लक राहिलेले पैसे सुरक्षित राहतात. त्यानंतर गुन्हेगारांनी वापरलेले मोबाइल नंबर किंवा इतर सोशल मीडियाच्या लिंकपर्यंत पोहोचून पुढील तांत्रिक तपास सुरू होतो. नागरिकांना असे कोणतेही कॉल आल्यास त्यांनी घाबरून जाऊ नये, आपली कोणतीच वैयक्तिक माहिती शेअर करू नये. तसेच तत्काळ 1930 या पोलीस सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा आमच्याकडे ऑनलाईन, ऑफलाईन तक्रार दाखल करावी, असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.