जाहिरात

Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट'मध्ये आयुष्याची कमाई लुटली! शेवटच्या क्षणी मुंबई पोलिसांची एंट्री; 15 लाख वाचले

Digital Arrest Scam: ज्येष्ठ नागरिकाच्या एका कृतीमुळे आणि मुंबई सायबर पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे त्यांचे लाखो रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट'मध्ये आयुष्याची कमाई लुटली! शेवटच्या क्षणी मुंबई पोलिसांची एंट्री; 15 लाख वाचले
Digital Arrest Scam: या फसवणुकीची सुरुवात एका साध्या व्हॉट्सअ‍ॅप व्हीडिओ कॉलने झाली. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Digital Arrest Scam: सायबर गुन्हेगारांनी आता 'डिजिटल अरेस्ट' नावाचा एक नवा आणि धोकादायक सापळा रचला आहे, ज्यात प्रामुख्याने निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक लक्ष्य होत आहेत. तुमचा बँक बॅलन्स शून्य करणारा हा 'स्कॅम' इतका प्रभावी असतो की, पीडित व्यक्ती घाबरून स्वतःहून गुन्हेगारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात. मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीतही हेच घडले. फसवणूक झाली, तब्बल 14 लाख 99 हजार रुपये गमावले... पण पुढच्या काही तासांतच त्यांच्या एका कृतीमुळे आणि मुंबई सायबर पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे त्यांचे लाखो रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'BBC मराठी' नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईत राहणारे तक्रारदार हे एकेकाळी लंडनच्या एका प्रतिष्ठित कंपनीत लेखापाल (Accountant) म्हणून कार्यरत होते. २००५ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते शांतपणे मुंबईत आयुष्य जगत होते. मात्र, 4 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या एका घटनेने त्यांचे आयुष्य ढवळून काढले.

या फसवणुकीची सुरुवात एका साध्या व्हॉट्सअ‍ॅप व्हीडिओ कॉलने झाली. कॉल करणाऱ्या 'संजय' नावाच्या व्यक्तीने आपण मुंबई पोलिसांचा अधिकारी असल्याचा दावा केला आणि थेट धक्कादायक माहिती दिली: "तुम्ही एका गंभीर मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये अडकला आहात. तुमचा सहभाग असल्याचे पुरावे आमच्या हाती आले आहेत आणि तुम्हाला संपूर्ण तपासामध्ये सहकार्य करावे लागेल."

( नक्की वाचा : Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा )

बनावट कागदपत्रे आणि मानसिक तणाव

सायबर गुन्हेगारांनी या निवृत्त नागरिकाला जाळ्यात ओढण्यासाठी अस्सल वाटावी अशी खोटी कागदपत्रे तयार केली होती. त्यांच्याच डेबिट कार्डचा बनावट फोटो दाखवून त्याचा गैरवापर झाल्याचे सांगितले. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट ‘सरकारी' दस्तऐवजांचा मारा सुरू केला.

या कागदपत्रांमध्ये सुप्रीम कोर्ट, 'सेबी' (SEBI) आणि 'ईडी' (ED) यांच्या नावावर जारी केलेले खोटे आदेश होते. इतकेच काय, तर भारत सरकारच्या सचिवांच्या नावाने स्वाक्षरी केलेले पत्र, अटक वॉरंट आणि बँक खाते गोठवण्याचा आदेश अशी 'खरी वाटावी' अशी कागदपत्रे पाहून ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे हादरले.

गुन्हेगारांनी त्यांच्या मनावर दबाव आणायला सुरुवात केली. "तुम्ही आता 'डिजिटल कस्टडी'मध्ये आहात. तपासादरम्यान तुम्ही कोणाकडेही याबद्दल वाच्यता केली किंवा सूचना पाळल्या नाहीत, तर तुम्हाला तात्काळ अटक होईल," अशी धमकी वारंवार देण्यात येत होती.

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीवरून वाद, मित्राचा गळा चिरला! आरोपीला पोलिसांनी शिकवला 'असा' धडा )

पैसे ट्रान्सफर आणि अखेरचा क्षण

या मानसिक तणावाखाली येऊन ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे घाबरले. आरोपींनी त्यांना 8 ऑक्टोबर रोजी एका बँक खात्याचा तपशील पाठवला आणि सांगितले की, "तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठी, तुमच्या खात्यातील सर्व पैसे या खात्यात ट्रान्सफर करावे लागतील. यामुळे तुमच्या पैशांची सत्यता सिद्ध होईल."

गुन्हेगारांच्या जाळ्यात पूर्णतः अडकल्यामुळे, या निवृत्त नागरिकांनी 11 ऑक्टोबर रोजी तत्काळ आदेशाचे पालन करत, तब्बल 14 लाख 99 हजार रुपये त्या बनावट बँक खात्यात ट्रान्सफर केले.

प्रसंगावधान आणि सायबर पोलिसांची 'तत्काळ' कारवाई

फसवणूक झाल्याच्या दिवशीच ज्येष्ठ नागरिकाला भेटण्यासाठी त्यांचे एक नातेवाईक आले. या नातेवाईकांशी बोलताना त्यांनी हा सर्व घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून नातेवाईकांना तत्काळ ही फसवणूक असल्याची शंका आली आणि त्यांनी या आजोबांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली.

आपल्याबरोबर फ्रॉड झाल्याचे लक्षात येताच, या आजोबांनी क्षणाचाही विलंब न करता दक्षिण सायबर पोलीस विभागाकडे धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्याकडे तक्रार नोंदवली.

या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन त्रिमुखे यांच्याकडे सोपवण्यात आला. ए.पी.आय. त्रिमुखे यांनी क्षणार्धात सूत्रे हलवली. त्यांनी त्वरित सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून कारवाई करत, आरोपींनी पैसे काढण्यापूर्वीच, ते ट्रान्सफर झालेले बँक खाते गोठवले (Freezed) आणि 14 लाख 99 हजार रुपये सुरक्षित केले, अशी माहिती 'BBC मराठी' च्या वृत्तामध्ये देण्यात आली आहे.

पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, या वृद्ध नागरिकाने 'डिजिटल अरेस्ट' दरम्यान स्वतःच्या बचावासाठी एक स्क्रीनशॉट घेतला होता. या स्क्रीनशॉटमध्ये एक महिला पोलिसांच्या गणवेशात दिसून येत आहे. या स्क्रीनशॉटसह इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन त्रिमुखे म्हणाले, "तक्रारकर्त्याने वेळीच माहिती दिल्याने आम्ही तत्काळ कारवाई करत बँक अकाउंट फ्रिज केलं, त्यामुळे आरोपींना हे पैसे काढता येणार नाही. आरोपींची सर्व माहिती काढली जात असून पुढील तपास सुरु आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर ते पैसे तक्रारकर्त्यास परत केले जातील याचा अर्थ, केवळ वेळेवर तक्रार केल्यामुळे या निवृत्त लेखापालांचे सुमारे 15 लाख रुपये वाचू शकले!

तुमचा बचाव तुमच्या हाती

या घटनेतून एक स्पष्ट धडा मिळतो की, सायबर फ्रॉड झाल्यानंतर घाबरून न जाता, जितक्या लवकर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधाल, तितके पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते. सायबर तज्ज्ञांनुसार, अशा 'डिजिटल अरेस्ट' किंवा इतर कोणत्याही सायबर गुन्ह्यात अडकल्यास या गोष्टी लक्षात ठेवा:

सरकारी हेल्पलाइन: '११२' किंवा केंद्र सरकारने सुरू केलेल्या '1930' या हेल्पलाइन क्रमांकावर (दिल्ली पोलिसांची हेल्पलाइन) त्वरित संपर्क साधा.
महाराष्ट्रासाठी खास क्रमांक: सायबर तक्रार देण्यासाठी  022-22160080 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता.
ऑनलाइन तक्रार: https://cybercrime.gov.in/ या पोर्टलवर तुम्ही कोणत्याही सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवू शकता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com