अमजद खान, प्रतिनिधी
मुंबईतील लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्याच्या वादानंतर एका प्रवाशाने एका महिला प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी मोहम्मद बेग याला मुंब्रामधून अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
टिटवाळामध्ये राहणारी ही दिव्यांग महिला काही कामानिमित्त मुंबईला गेली होती. 16 मे रोजी तिने रात्री नऊ वाजताच्या सुमारास कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याला जाणारी लोकल पकडली. या महिलेनं दिव्यांगांच्या डब्यात प्रवेश केला. पण, तिला सीटवर बसू दिले नाही. तिने विरोध केल्यानंतर त्या व्यक्तीने तिला मारहाण केली. विरोध करणाऱ्या व्यक्तीसोबत त्याची गरोदर पती आणि मुलगीही होती.
या दिव्यांग महिलेला मारहाण करण्यात आली. या महिलेनं लोकल थांबवण्यासाठी चेन खेचण्याचा प्रयत्न केला. पण, लोकल थांबली नाही. . या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी घेतली.
त्यांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेत मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या तपासाकरीता त्यांनी तीन तपास पथके नेमली. गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासाच्या आत मुंब्रा येथून आरोपी मोहम्मद बेग याला अटक केली. बेग हा प्लंबरचे काम करतो.
( नक्की वाचा : Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू )
पीडित महिलेनं सांगितलं की, दिव्यांगांसाठी राखीव डबा आहे. त्या डब्यातून धडधाकड प्रवासी प्रवास करतात. त्यांना रोखले की ते अरेरावी करुन प्रसंगी मारहाण करतात. तोच प्रकार माझ्यासोबत झाला. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटक केली. भविष्यात या प्रकारच्या घटना होऊ नयेत, ही अपेक्षा आहे.