डोंबिवलीत घरफोड्या करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला, चोरटे गजाआड

Dombivali Crime: डोंबिवलीमध्ये घरफोड्या करून उत्तर प्रदेशात आलिशान बंगला बांधणाऱ्या दोघांना पोलिसांनी असे केले गजाआड...

जाहिरात
Read Time: 3 mins

अमजद खान, कल्याण

डोंबिवलीमधील स्थानिकांच्या घरावर डल्ला मारून उत्तर प्रदेशामध्ये आलिशान बंगला बांधणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दोघांकडून 23 लाख रुपये किमतीचे चोरी केलेले दागिने देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. राजेश उर्फ बबलू कहार आणि चिंटु निसार अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. कल्याण डोंबिवलीसह या दोघांनी आसपासच्या परिसरामध्येही कित्येक घरांमध्ये चोरी केल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे. 

(नक्की वाचा: पतीसोबत झाले कडाक्याचे भांडण, पत्नीने दिव्यांग मुलाला फेकले मगरींच्या तोंडी; कारण...)

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती

डोंबिवलीतील एका नामांकित डॉक्टराच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून हे चोरटे घरामध्ये शिरले आणि घरातील मौल्यवान वस्तू-दागिने चोरी करून पसार झाले. काही महिन्यांपूर्वीच हा प्रकार घडला होता. याचदरम्यान डोंबिवलीतील काही घरांमध्येही चोरी झाल्याच्या तक्रारी परिसरातील पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आल्या. या सर्व प्रकरणांमध्ये चोरी करण्याची पद्धत एकसारखीच असल्याचे तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले. खिडक्यांचे ग्रील तोडून चोरटे घरामध्ये शिरायचे. यानंतर घरातील दागिन्यांसह मौल्यवान वस्तू चोरून पसार व्हायचे.  

Advertisement

(नक्की वाचा : दाभोसा धबधब्यावर स्टंट करणे बेतले जीवावर, 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू)

चोरट्यांच्या अटकेसाठी पोलिसांची मोहीम 

या चोरट्यांनी परिसरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. परिसरामध्ये त्यांची दहशत निर्माण झाली होती. स्थानिकांच्या तक्रारी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनांर्तगत पोलीस अधिकारी संपत फडोळ आणि राहुल म्हस्के यांच्या पथकाने चोरट्यांना गजाआड करण्यासाठी मोहीम आखली 

Advertisement

(नक्की वाचा: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल)

पोलिसांनी असा रचला सापळा

हे सराईत चोर उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील एका गावामध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस पथक उत्तर प्रदेशात दाखल झाले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे मानपाडा पोलीस पथकाने एका घरावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईमध्ये राजेश कहारला बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर राजेशनंच दिलेल्या माहितीनुसार चिंटुच्या घरावर देखील पोलिसांनी छापा टाकत तासाभरात त्यालाही अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरट्यांकडील 23 लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.

Advertisement

गावामध्ये बांधला आलिशान बंगला

धक्कादायक बाब म्हणजे डोंबिवलीतील स्थानिकांच्या घरांमध्ये चोरी करून या दोघांनी आपल्या गावामध्ये आलिशान बंगला बांधला. तसेच चौकशीदरम्यान चोरट्यांकडून तब्बल 24 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलीस पथकाने उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाच दिवस अहोरात्र काम करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. 

श्रीमंताच्या घरांची करायचे पाहणी

डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मानपाड पोलीस ठाण्यामध्ये वर्ष 2022मध्ये घरफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी काम केल्यानंतर दुसऱ्या राज्यातील आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश आले. आरोपींना अटक केल्यानंतर 325 ग्रॅम सोने आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण 22 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी राजेश उर्फ बबलू कहारने नवी मुंबई, ठाणे परिसरामध्ये घरफोडी केल्या आहेत, त्याच्यावर घरफोडीचे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी चिंटु निसार सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधातही सात गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी श्रीमंत घरांची पाहणी करून यानंतर रात्रीच्या वेळेस घरफोडी करायचे". 

NDTV मराठी Special | गोबरगॅसपासून वीजनिर्मिती, लहानुजी संस्थानाची जबरी आयडिया

Topics mentioned in this article