Dombivli News : डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात एका पतीने किरकोळ घरगुती वादातून त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला असून, मानपाडा पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
कोळेगावातील एका भाड्याच्या खोलीत राहणारे पोपट धाहीजे आणि ज्योती धाहीजे यांच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खटके उडत होते. बुधवारी (26 नोव्हेंबर) त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पोपट धाहीजे यांनी पत्नी ज्योती यांची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तेथून पळून गेले. या दाम्पत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी अशी 3 मुले आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी पोपट धाहीजे फरार झाला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीच्या 'त्या' सुटकेसची कहाणी! 25 वर्षांच्या तरुणीचा खून कशासाठी? CCTV मध्ये उलगडलं गूढ )
प्राथमिक माहितीनुसार, धाहीजे कुटुंब मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. चांगल्या रोजगाराच्या शोधात ते डोंबिवलीत आले होते. आरोपी पोपट धाहीजे हा डोंबिवलीतील एका मोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवर बिगारी म्हणून काम करत होता.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयत ज्योती धाहीजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे. या हत्येमागील नक्की कारण काय आहे, हे आरोपी पोपट धाहीजे याला अटक केल्यावरच स्पष्ट होईल. आरोपीला शोधण्यासाठी मानपाडा पोलिसांनी 2 विशेष तपास पथके तयार केली असून, पोलीस पोपट धाहीजे याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.