Dombivli News : डोंबिवली जवळच्या पलावा सिटीजवळील देसाई खाडी किनारी एका सुटकेसमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा डायघर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत यशस्वीरित्या उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडणे पोलिसांना शक्य झाले. ही हत्या मृत तरुणीच्या लिव्ह-इन पार्टनरनेच किरकोळ वादातून केल्याचे आता समोर आले आहे.
कोण होता मारेकरी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्रियंका विश्वकर्मा (Priyanka Vishwakarma) असून, तिचा खून करणारा आरोपी दुसरा कोणी नसून तिचा लिव्ह-इन पार्टनर विनोद विश्वकर्मा (Vinod Vishwakarma) हाच आहे.
विनोद आणि प्रियंका हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून विनोदने रागाच्या भरात प्रियंकाचा गळा दाबून तिचा जीव घेतला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विनोदने तिचा मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये भरला आणि ती सुटकेस देसाई खाडीजवळ आणून फेकून दिली. सुटकेस घेऊन जात असताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि याच फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला.
( नक्की वाचा : Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका )
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी डायघर (Dighar) परिसरातील खाडी किनारी स्थानिकांना एक बेवारस मोठी सुटकेस आढळली होती. संशय आल्याने त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ती सुटकेस उघडली. आतमध्ये एका अंदाजे 25 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
सुरुवातीला, मृतदेह अत्यंत निर्घृणपणे सुटकेसमध्ये कोंबलेला असल्यामुळे, पोलिसांनी अज्ञात आरोपींनी तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने तो खाडीत फेकून दिला असावा, असाही संशय व्यक्त झाला. पोलिसांनी या घटनेनंतर अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.
( नक्की वाचा : D-Mart News : डी-मार्टचा कर्मचारीच निघाला 'चोर'; बारकोड स्कॅन होताच किंमत व्हायची कमी, काय आहे घोटाळा? )
या घटनेनंतर डायघर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला होता. मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या पोलीस ठाण्यांमधील मिसिंग तक्रारींची (Missing Complaints) कसून तपासणी सुरू होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
त्याचबरोबर, पोलीस पथके खाडी परिसरातील आणि आजूबाजूच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत होती. ही सुटकेस याच परिसरात टाकली गेली की पाण्याच्या प्रवाहातून वाहून आली, याचीही चाचपणी सुरू होती. या सखोल तपासामुळेच अखेर विनोद विश्वकर्मा सुटकेस घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसला आणि पोलिसांच्या हाती निर्णायक धागा लागला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी विनोदला ताब्यात घेतले असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुल दिली. किरकोळ वादातून त्याने प्रियंकाची गळा दाबून हत्या केल्याचे त्याने सांगितले.
या जलद कारवाईमुळे, डायघर पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा 12 तासांत छडा लावून आरोपीला अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world