Dombivli News: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातचे नवनवे काळे कारनामे समोर येत आहेत. अशोक खरातने भविष्य सांगण्याच्या नावाखाली शेकडो महिलांचे लैंगिक शोषण, अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारे खरात प्रकरण चर्चेत असतानाच डोंबिवलीमध्ये जादुटोण्याच्या नावाखाली वयोवृद्ध व्यक्तीला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
डोंबिवलीत वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील कथित ‘दोष' उतरवण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने वयोवृद्ध व्यक्तीला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी दीपक सावंत नावाच्या आरोपीला कल्याण येथून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याने उपाय शोधत होते. त्याच वेळी दीपक सावंत याने स्वतःला ‘बाबा' म्हणून भासवत विशेष विधी करून दोष दूर करण्याचे आमिष दाखवले. विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मी नाणी घेतली. विधीदरम्यान आरोपीने हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगितले आणि चलाखीने रुमालाची अदलाबदल केली.
भोंदुबाबाला अटक
त्यानंतर दुसरा रुमाल हातात देऊन तो तेथून पसार झाला. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दीपक सावंत याला कल्याण परिसरातून अटक केली. आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.दरम्यान, नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता कोणत्याही अशा ‘विधी' किंवा ‘उपायां'पासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
VIDEO: लोणावळ्यात जात असाल तर सावधान! पर्यटक कुटुंबासोबत भयंकर घडलं