सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड
Lonavla News: पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या आणि वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोणावळ्याजवळ कार चालकांना लुटण्यासाठी गुन्हेगारांनी आता एक नवीन आणि 'हायटेक' शक्कल लढवली आहे. बनावट बँक लोन रिकव्हरीचा बहाणा करून चालकांना धमकावण्याचे प्रकार वाढले असून, या टोळीचा पर्दाफाश एका जागरूक चालकामुळे झाला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळील निर्जन स्थळी कार चालकांना लक्ष्य करणारी एक भामटी टोळी सक्रिय झाली आहे. बँकेचे कर्ज थकीत असल्याचे सांगून गाडी जप्त करण्याचा बनाव रचत ही टोळी लूट करत असल्याचे एका ताज्या घटनेवरून समोर आले आहे.
लोणावळ्यात पर्यटकांना फसवण्याचा प्रयत्न
एका चालकाने काही दिवसांपूर्वीच Cars24 कडून सेकंड हँड ह्युंदाई व्हेरना खरेदी केली होती. लोणावळ्याजवळून जात असताना दुचाकीवरील काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. चालकाला जबरदस्तीने गाडी थांबवण्यास भाग पाडल्यानंतर, या तरुणांनी या गाडीवर आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे 10 लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे, आम्हाला गाडी ओढून नेण्याचे आदेश आहेत," असा बनाव रचला.
पाहा VIDEO
Lonavala Fake Recovery Agent | लोणावळ्यात 'फेक' बँक एजंटकडून पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न#lonavala #fake #recovery #agent #ndtvmarathi pic.twitter.com/0Doxkd60q2
— NDTV Marathi (@NDTVMarathi) March 24, 2026
(नक्की वाचा- Ashok Kharat: नवऱ्याला बाहेर बसवून गर्भवती पत्नीला कॅबिनमध्ये बोलावलं अन्... अशोक खरातचं संतापजनक कृत्य)
परिस्थिती संशयास्पद वाटल्याने चालकाने गाडीचा दरवाजा उघडला नाही किंवा काचही खाली केली नाही. उलट, त्याने तातडीने डायल 112 वर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस येत असल्याचे समजताच दोन्ही भामटे पसार झाले. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकीस्वारांचा शोध घेतला जात आहे.
फसवणुकीची नवीन पद्धत
ही टोळी विशेषतः सेकंड हँड गाड्यांना टार्गेट करत असल्याचे दिसते. जुन्या गाड्यांच्या व्यवहाराची माहिती काढून किंवा केवळ संशयावरून ते चालकांना घाबरवतात. "बँकेतून आलो आहे," असे सांगून ते चालकाला गाडीबाहेर येण्यास भाग पाडतात आणि नंतर गाडी किंवा मौल्यवान वस्तू घेऊन पसार होतात.
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?
- निर्जन ठिकाणी कोणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केल्यास वेग कमी करू नका.
- संशयास्पद व्यक्तींशी संवाद साधताना गाडीचा दरवाजा उघडू नका.
- बँका कधीही अशा प्रकारे महामार्गावर गाडी ओढून नेण्यासाठी माणसे पाठवत नाहीत. अधिकृत रिकव्हरीसाठी कायदेशीर नोटीस आवश्यक असते.
- संशय आल्यास त्वरित 100 किंवा 112 नंबरवर कॉल करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world