Dombivli News: डोंबिवली शहरात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका हिंदुत्ववादी संघटनेत काम करणाऱ्या महिला कार्यकर्तीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी त्याच संघटनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या महिलेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे डोंबिवलीत मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका बड्या हिंदुत्ववादी संघटनेत काम करणाऱ्या महिला कार्यकर्तीने या संदर्भात रामनगर पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी करण उल्लंघन नावाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी हा देखील त्याच संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.

तक्रारदार महिला ही डोंबिवली परिसरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक आणि संघटनात्मक कामांमध्ये नेहमीच पुढे असते. विशेषतः लव्ह जिहादसारख्या अत्यंत संवेदनशील प्रकरणांमध्ये आणि महिलांच्या जनजागृती मोहिमांमध्ये ती सक्रियपणे सहभाग घेत असते. समाजकार्यात सतत व्यस्त असणाऱ्या या महिलेसोबत तिच्याच संघटनेच्या व्यक्तीने असे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : 'भगवान श्रीकृष्ण मुस्लीम, दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे!' मौलाना जार्जिस यांचं वादग्रस्त वक्तव्य, पाहा VIDEO )
अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप
महिलेला मानसिक त्रास देण्याच्या आणि तिची छळवणूक करण्याच्या उद्देशाने आरोपी करण उल्लंघन याने तिच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ पाठवले होते, असा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेने तातडीने रामनगर पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. रामनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world