योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News Today : अकोला जिल्ह्यातील अकोली बुद्रुक येथील भारतीय सैन्यातील जवान सुशील दिलीप तेलगोटे सात दिवसांच्या बदली रजेवर पाच दिवसांसाठी त्यांच्या गावी आले होते. सुट्टीचा काळ कुटुंबीयांसोबत घालवण्यासाठी ते आई-वडील आणि नातेवाईकांसोबत राहण्यासाठी घरी आले होते. मंगळवारी ते आपल्या सासरवाडी बोरगाव मंजू येथे जाऊन सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घरी परतले. त्यानंतर त्यांना जय मुरेकरचा फोन आला. त्यानंतर जय मुरेकर स्वतः दुचाकीवर येऊन सुशील यांना घेऊन गेला. त्यावेळी सोलापुरे, गोलू ठाकूर आणि त्याचे काही सहकारी यांच्यासोबत पार्टी करण्यासाठी जातो आणि अर्ध्या तासात परत येतो, असे सांगून सुशील घरातून निघून गेले. त्यामुळे कुटुंबीयांनाही त्याबाबत काही शंका वाटली नाही. मात्र अर्धा तास उलटूनही सुशील घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. सुशील यांच्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्या इनसाईड स्टोरी.
शाब्दिक वादातून जीवघेणा हल्ला, मित्रांनी केला मित्राचा घात
रात्री 9 वाजताच्या सुमारास वडील दिलीप तेलगोटे आणि इतर नातेवाईकांनी सुशील यांना फोन केला असता, ते घरी येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल फोन बंद झाला. साडेअकराच्या सुमारास जय मुरेकर याने दिलीप तेलगोटे यांना फोन करून सुशील घरी आले का, अशी विचारणा केली. यावेळी सुशील यांच्या पत्नीने ते अजून घरी आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर सुशील यांनी पत्नीला फोन करून “मी जेवण करून येतो, तू काळजी करू नको” असे सांगितले आणि फोन ठेवला.
नक्की वाचा >> Video: शेअर मार्कटमध्ये 10 लाख बुडाले, कर्मचाऱ्याने ज्वेलरी शॉपमध्ये केलं मोठा कांड, CCTV पाहून मालक हादरला
दरम्यान सुशील आणि त्याच्या मित्रांमध्ये काही कारणावरून शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादातून गोलू ठाकूर व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी सुशील तेलगोटे यांच्यावर लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुशील गंभीर जखमी झाले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी त्यांना दारूच्या नशेत काहीतरी देऊन बेदम मारहाण केली आणि विषप्रयोग केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या प्रकारामुळे गंभीर जखमी अवस्थेत सुशील तेलगोटे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात मंगळवार रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 27 मार्च शुक्रवार रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान सुशील यांचे वडील दिलीप तेलगोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Ashok Kharat : खरातचे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतोय? कोणा कोणाचा आहे समावेश? प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण
पोलिसांनी गोलू ठाकूर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. मात्र या प्रकरणात आणखी चार ते पाच आरोपी सहभागी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही सुशील यांचा मृतदेह येथून उचलणार नाही किंवा आम्ही स्वतः जीवाशी काहीतरी करणार असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केलंय. त्यानंतर सुशील वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सुरू आहे.