संजय तिवारी, प्रतिनिधी
सध्या देशभरात नायलॉन मांजाची दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्याभरात अनेकजणं मान कापल्यामुळे जबर जखमी झाले आहेत. तर कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता तर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. माणसांचे गळे कापणारा मांजा विजेच्या ताराही तोडू शकत असल्याचं उघडकीस आलं आहे. नायलॉन मांजा विद्युत तारांसाठी देखील धोकादायक ठरू शकतो हे समोर आल्यानं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अभियंतेदेखील हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नांदुरा शहरात पतंगच्या मांजामुळे कित्येक ठिकाणी विजेचे तारा तुटल्या आहेत. त्यामुळे नांदुरा शहरातील या भागातील वीज पुरवठा बंद पडला. यावेळी काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अभियंत्यांना यश आलं मात्र उर्वरित ठिकाणी नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली अशी माहिती आहे. सुमारे 3 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन उचलू शकणारा नायलॉन मांजाने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला. आता हा मांजा विद्युत तारांसाठी धोकादायक ठरू शकतो हे समोर आल्यानं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनाही धक्का बसला आहे.
नक्की वाचा - Nashik Crime : आताची मोठी बातमी, नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू
तीक्ष्ण सुरी किंवा तरवारीसारखा परिणाम साधणारा नायलॉन मांजा विजेच्या तारा तोडू शकतो, हे भयानक सत्य समोर आल्याने वीज पुरवठा संबंधी एक नवे आव्हान निर्माण झाले आहे असे म्हणता येईल. दुचाकीस्वारांचे गळे चिरून किंवा चेहऱ्यावर दुखापत करून बदनाम झालेल्या नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजा विद्युत पुरवठा खंडित करू शकतो हे भीषण वास्तव बुलढाण्यातील नांदुरा येथे समोर आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग बाजीला उधाण आले असताना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात अनेक विद्युत तारांमधील वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले आहेत.