मनोज सातवी
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील भिलाड येथे सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा सुरत रेंज आयजींच्या सायबर क्राईम टीमने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 2 महिलांसह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व आरोपी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू होता.
नक्की वाचा: तरुणीवर बॉयफ्रेंडसमोर सामूहिक बलात्कार, ओडिशामधील धक्कादायक घटना
हॉटेलमध्ये सुरू केले कॉल सेंटर
मिळालेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर क्रिस्टल इन हॉटेलमध्ये चालवले जात होते. या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना विविध किफायतशीर योजनांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात होती. या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून संगणक आणि फसवणुकीसाठी वापरली जाणारी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
नक्की वाचा: वसई-विरारमध्ये अवैध बांधकाम माफियाची दहशत; तोडक कारवाई रोखली, मनपा कर्मचारी 3 तास ताटकळत उभे
आरोपींमध्ये दोन महिलाही
अटकेतील आरोपींमध्ये जरार उर्फ मिसाम आलमदार हैदर, अझरुल इस्लाम रिझर्व्ह मलेक, संकेत नरेंद्र मकवाना, दलजितसिंग जगदीश सलोजा, सोचेब इकबाल शेख, अरफद सर्फराज सिद्दीकी, तनवीर रफिक खान, समीम शाहिद खान, फहीम अब्दुल गफ्फार शेख, सुबोध प्रकाश भालेकर, राहुल किशन सरसर, इग्नेशियस जेफ्री मेस्फर्नेश यांचा समावेश आहे. तसेच, हर्षदा विजय उतेकर आणि माधुरी उर्फ निक्की सुधीर पैकर या 2 महिलांनाही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींवर फसवणूक आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: केडीएमसी कर्मचाऱ्यावर कल्याणमध्ये जीवघेणा हल्ला; बदलापूरमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी सामील
म्होरक्या सनी पांडे फरार
या कॉल सेंटर रॅकेटचा म्होरक्या सनी पांडे (मुंबई) आणि एक अज्ञात व्यक्ती फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या रॅकेटची पाळेमुळे कुठे कुठे पसरली आहेत, याचा तपास सायबर क्राईम पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे जाळे समोर आले आहे.