
मनोज सातवी, प्रतिनिधी
वसई विरारमध्ये अवैध बांधकाम माफिया आणि पालिका अधिकाऱ्यांचे साटे लोटे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. पेल्हार प्रभागातील चौधरी कंपाऊंडमध्ये एका नव्या इंडस्ट्रियल गाळ्याच्या अनधिकृतपणे बांधकामावर तोडक कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला बांधकाम माफियाने रिकाम्या हाती पाठवलं. विशेष म्हणजे या मुजोर बांधकाम माफियाकडून तोडक पथकातील कर्मचाऱ्यांना टाळकी फोडण्याची आणि जेसीबी जाळण्याची धमकी देऊन तब्बल तीन तास ताटकळत ठेवून कारवाई न करताच परत पाठवलं. त्यामुळे विरार येथील इमारत दुर्घटनेनंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी गणेशोत्सवानंतर एकही अनधिकृत बांधकाम होऊ न देण्याची दिलेली हमी पायदळी तुडविली गेली.
त्यामुळे या अवैद्य बांधकाम माफियावर कुणाचा वरदहस्त..? कुणाच्या आदेशाने महापालिका पथकाने तोडकारवाई थांबवली ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची आता स्वच्छ प्रतिमा असलेले महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरारमध्ये नारंगी भागात 26 ऑगस्ट रोजी इमारत कोसळून निष्पाप 17 जणांचा बळी गेला. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी गणपती सणानंतर अवैध बांधकामांवर कारवाईची माध्यमांसमोर जाहीरपणे हमी दिली, तसेच यापुढे एकही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही अशी भीम गर्जना केली. त्यावेळी पालकमंत्री सोबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी उपस्थित होते. परंतू पालकमंत्र्यांची ही घोषणा महापालिका अधिकाऱ्यांनी पायदळी तुडवीत अवैध बांधकाम माफियांना संरक्षण देत असल्याचे उघड झाले आहे.
नक्की वाचा - Crime News : बहिणीच्या घरी गेला अन् Air Force सैनिकाने 24 व्या मजल्यावरुन मारली उडी!
पेल्हार प्रभागातील चौधरी कंपाऊंडमध्ये एका नव्या इंडस्ट्रियल गाळ्याचे अनधिकृतपणे बांधकाम चालले होते. आतमध्ये अद्याप प्लास्टरही नाही, बांबूचा ढाचा दिसत होता, पण बाहेर ताजे पेंट आणि नुकताच शटर लावून हे बांधकाम जुने दाखवण्याचा प्रयत्न अवैध बांधकाम माफिया साहिल याने केला होता. मनपाच्या अतिक्रमण विरोधी टीमच्या येण्याची सूचना मिळताच साहिलने टेम्पोतून काहीतरी समान आणून बांधकाम अपूर्ण असलेल्या गाळ्यात भरून ठेवलं. हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे.
मनपा जेसीबीने जवळ आल्यावर साहिल नावाचा अवैध बांधकाम माफिया मनपा अधिकाऱ्यांना शिव्या देत धमकावतो आणि जेसीबी जाळून देईन, सगळ्यांचे डोके फोडेन असे म्हणतो. तसेच कुणाशी तरी फोनवर बोलून कारवाई होऊ देत नाही. मनपा पथकातील कर्मचारी तीन तास तेथे घाबरून उभे राहतात आणि उच्च अधिकाऱ्यांना फोन करतात, तरी त्यांना तातडीची मदत मिळत नाही. खरंतर 112 नंबरवर फोन करून तातडीने पोलिसांची मदत मिळवता आली असती, परंतु केवळ अनधिकृत गाळ्याचे जेसीबीने शटरकडून महापालिकेचे पथक कारवाई न करताच माघारी फिरते. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. त्यामुळे गंभीर प्रकरणाची दखल नवनियुक्त महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी घेणार का..? आणि अशा अनधिकृत बांधकाम माफियांवर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world