Faridabad firing case : हरियाणातील फरिदाबादमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील वल्लभगडमधील लायब्ररीतून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीवर एका १९ वर्षीय माथेफिरूने गोळीबार केला आहे. सोमवारी सायंकाळी वल्लभगडच्या श्याम कॉलनीमध्ये मुलीवर गोळीबार केल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.
मुलगी क्लासमधून घरी परतत असताना रस्त्यात एक तरुण तिची वाट पाहत होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, तो मुलगा तिच्याकडे आला आणि त्याने गोळीबार केला आणि नंतर पळून गेला. त्याने दोन राउंड गोळीबार केला. हे पाहून मुलीला धक्का बसला. व्हिडिओमध्ये ती स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचं नाव जतिन मंगल असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, आरोपी हा विद्यार्थिनीला आधीपासून ओळखत होत. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा - Instant Karma Videos: मुंब्र्यात दुचाकी चालकाची छपरीगिरी; धावत्या बाईकला लाथ मारली, त्यानंतर...
एकतर्फी प्रेमातून गोळीबार?
या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, तरुणीसोबत तिच्या मैत्रिणी रस्त्यावरुन चालत आहेत. ती त्यांच्यापेक्षा थोडी पुढे चालत होती. तरुणी सुमारे १७ वर्षांची असल्याचे सांगितले जात आहे आणि ती १२वीच्या वर्गात शिकते. ती दररोज याच रस्त्यावरुन अभ्यास करण्यासाठी जात होती. आणि तेथेच हा प्रकार घडला. तरुण तिच्यावर पाळत ठेऊन असावा अशी शक्यता आहे. दरम्यान माथेफिरू तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू आहे.