Crime News : शेजारच्यांमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरुन वाद होत असतात. अनेकदा कचरा टाकण्यावरुन किंवा अशा अनेक गोष्टी वादाचं कारण ठरतात. मात्र कोकणात एक मांजर शेजारच्यांमध्ये वादाचं कारण ठरलं आहे. यातून केवळ वादच झाला नाही तर मारहाणही झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, मांजर घरात आल्याच्या रागातून कोलगाव- नाईकबाग येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. दांड्याने मारहाण केल्यामुळे एका कुटुंबातील महिला आणि तिची मुलगी दोघीजणी जखमी झाल्या आहेत. रेखा सावंत (वय 26) आणि अनिता अजित सावंत (वय 50) अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलगाव-नाईकबाग येथील आत्माराम सावंत यांचे मांजर तेथीलच रेखा सावंत यांच्या घरात गेले होते. सावंत कुटुंबाने तुमचं मांजर आमच्या घरात आलं या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच बांबूच्या दांड्याने पायावर मारहाण केली, अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार अनिता अजित सावंत व रेखा अजित सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - दक्षिण कोरियाचे 60 लाख नागरिक अयोध्याला समजतात स्वत:चं 'माहेर', वाचा काय आहे कारण?
दरम्यान फिर्यादी रेखा अजित सावंत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आत्माराम सावंत व रामचंद्र सावंत यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात परस्पर विरोधी जीवे मारहाण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.