मनोज सातवी, प्रतिनिधी
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Former Vasai-Virar Municipal Commissioner Anil Kumar Pawar) आणि त्यांच्या पत्नी भारती अनिलकुमार पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. अनिलकुमार यांच्या बदलीच्या दुसऱ्यात दिवशी ईडीने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. यात त्यांच्या निवासस्थानातून मोठी रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली होती. त्यामुळे आजच्या चौकशीत त्यांना याबाबत जाब विचारला जाणार असल्याची माहिती आहे.
ED ने 29 जुलै रोजी वसई येथील अनिलकुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी 18 ते 19 तासांची छापेमारी केली होती. याच सोबत ED ने अनिलकुमार पवार यांच्याशी संबंधित नाशिक, पुणे, सातारा अशा एकूण 12 ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी अनिलकुमार यांनी ED च्या अधिकार्यांना तब्बल एका तासापासून जास्त वेळ बंगल्यात शिरू दिले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच त्यांनी दार बंद करून घेतले होते. त्या काळात त्यांनी बेनामी संपत्ती, नोटा, इत्यादी पुरावे नष्ट केले, असाही त्यांच्यावर आरोप आहे.
नक्की वाचा - 'गाडीला कट का मारला...' शासकीय डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी, धाराशिवचा धक्कादायक CCTV
या छाप्यात ईडीने त्यांच्या पुतण्याकडून 1 कोटी 33 लाख रुपयांची रोकड, तसेच महत्त्वाची कागदपत्रे आणि हार्डडिस्क जप्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर चौकशी प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी पवार दाम्पत्याला अधिकृतरित्या समन्स बजावण्यात आले आहे.