शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : अमरावतीच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एका खळबळजनक प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका मुख्याध्यापकाने चक्क माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून वैद्यकीय देयक लाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 38,825 रुपयांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकावर हा प्रताप करण्यात आला असून, यामुळे संपूर्ण शिक्षक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथे शाह अंजुमन उर्दू हायस्कूल आहे. या शाळेचे मुख्याध्यापक हारुण शाह बाबा शाह यांनी 30 सप्टेंबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीतील स्वतःचे 38,825 रुपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरीसाठी वेतन पथकाकडे सादर केले होते.
नियमानुसार या देयकावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक असते. मात्र, हे देयक तपासत असताना वेतन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावरील स्वाक्षरीबाबत शंका आली आणि या फसवणुकीचा पदर उलगडत गेला.
( नक्की वाचा : Kalyan News: सावधान! 5 लाखांच्या बदल्यात 7 लाख देतो म्हणाले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; कल्याणमधील थरार )
असा उघड झाला बनावटगिरीचा प्रकार
वेतन पथकाने जेव्हा या देयकातील कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली, तेव्हा धक्कादायक बाबी समोर आल्या. मुख्याध्यापकांनी सादर केलेल्या वेतन आदेशावरील नावात खोडतोड करण्यात आली होती. इतकेच नाही तर शिक्षणाधिकाऱ्यांची हुबेहूब बनावट स्वाक्षरी तिथे करण्यात आली होती.
देयकाच्या मूळ आदेशावर व्हाईटनर लावून माहिती बदलण्याचे धाडस देखील या मुख्याध्यापकाने केल्याचे निदर्शनास आले. सरकारी कागदपत्रांशी केलेली ही छेडछाड आणि आर्थिक फसवणुकीचा हेतू स्पष्ट झाल्याने वेतन विभागाच्या अधीक्षकांनी तातडीने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे याची माहिती दिली.
( नक्की वाचा : Amravati News: दहावी पेपर घोटाळ्याचे धागेदोरे थेट खासदारांपर्यंत; आरोपीसाठी कुणी लावला होता वशिला? )
या गंभीर प्रकरणाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांनी मुख्याध्यापक हारुण शाह बाबा शाह यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी स्वाक्षरीची नक्कल करणे आणि शासनाची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये तक्रार दिली आहे.
शिक्षण विभागाने 12 फेब्रुवारी 2026 रोजी ही तक्रार दाखल केली असून, सध्या पोलिसांनी हे प्रकरण चौकशीसाठी ठेवले आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे कृत्य केल्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रतिमेला तडा गेला आहे.