साताऱ्यात भरवला जुगाराचा अड्डा; खेळणाऱ्यांना आयोजकांकडून दारू, मांसाहारी जेवणाची सोय

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

सुजित आंबेकर, प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खटाव तालुक्यातील कातरखटाव दहिवडी रोज शेजारील बोंबाळे गावाच्या हद्दीत मोठा जुगाराचा अड्डा भरवण्यात आल्याचा व्हिडिओ आहे. धक्कादायक म्हणजे जुगाराचा अड्डा भरवणाऱ्या आयोजकांनी जुगार खेळणाऱ्यांसाठी दारू आणि मासांहारी जेवणारी सोय केली आहे. 

साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव दहिवडी रोड शेजारी बोंबाळे गावच्या हद्दीत सर्वात मोठा जुगाराचा अड्डा भरल्याचा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे. एका शेतामध्ये असलेल्या शेडमध्ये हा जुगाराचा अड्डा भरवण्यात आला आहे. यामध्ये अनेक राजकीय मंडळी असल्याने पोलीस कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे. जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांना आयोजकांकडून दारू आणि मांसाहारी जेवण पुरवलं जात आहे. सातारा जिल्ह्यात अवैध धंदे बंद असल्याची ढोलकी पोलीस वाजवत असताना या व्हिडिओमुळे येथील सत्यपरिस्थिती समोर आली आहे. 

नक्की वाचा - 'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा'

येथे दररोज लाखोंची उलाढाल होत असून उघडपणे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलीस प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. पोलिसांचे अभय असल्याने या ठिकाणी शेजारील जिल्ह्यातील बुकी देखील खेळण्यासाठी येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पोलीस प्रमुखांना अंधारात ठेऊन स्थानिक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी डोळ्यात धूळफेक करत आहेत. पुण्यात एका हॉटेलमध्ये अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली होती. पुणे पोलिसांसारखे सातारा पोलीस देखील कारवाई करणार का? पोलीस अधीक्षक समीर शेख काय कारवाई करणार याकडे आता साताऱ्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.