मनोज सातवी, प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये सध्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. 'मुख्यमंत्र्यांचा जिल्हा..पालकमंत्री बेपत्ता', 'पालकमंत्री नाही थाऱ्यावर...जनतेला सोडलं वाऱ्यावर...' तसेच, 'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा आणि 1 गावठी कोंबडा आणि वलगणीचे (चाढणीचे) मासे बक्षीस मिळवा.' अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. सध्या या बॅनरची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुठेच फिरकले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे यांनी केला आहे. आरोप करीत त्यांनी शंभुराज देसाई यांच्या नावाची बॅनरबाजी केली आहे. सध्या हे बॅनर मुरबाडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
नक्की वाचा - 'लाडकी बहीण' योजनेच्या अटीमध्ये महत्त्वाचे बदल, अर्ज भरण्यापूर्वी वाचा सर्व माहिती
या बॅनरवर लिहिलं आहे, 'साहेब आपला पत्ता कुठेच लागत नाही. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. जिथे कुठे असाल तिथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय. आपल्या जिल्ह्यात असंख्या समस्या आहेत.' पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासातले म्हणून ओळखले जातात. म्हणूनच साताऱ्यातील असूनही त्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुरबाड तालुक्यात आदिवासी भागातील रस्त्यांच्या समस्या, वैद्यकीय सुविधांचा अभाव यांसारख्या अनेक प्रश्नांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांची कोंडी होत आहे. या महामार्गावरील वासिंद, खातिवली, आसनगाव या रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामं सुरू असल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याबाबत स्थानिकांकडूनही तक्रार करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप त्यावर उपययोजना करण्यात आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world