रेवती हिंगवे, प्रतिनिधी
आजची तरुणाई नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या डेटिंग अॅपचा आधार घेते. भिन्न लिंगी व्यक्तींप्रमाणेच समलिंगीमध्येही डेटिंग अॅप वापरण्याचं प्रमाण वाढत आहे. याचा उपयोग हा मैत्री आणि प्रेमसंबंधांसाठी होतो. त्याचबरोबर याचा वापर फसवणुकीसाठी होत असल्याच्या घटनाही उघड झाल्या आहेत. पुण्यातल्या एका तरुणालाही या डेटिंग अॅपचा चांगलाच अंगाशी आला आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या या तरुणाची गे डेटिंग अॅप 'ग्राइंडर'वरून एका तरुणाशी ओळख झाली. आरोपीनं पीडित तरुणाशी आधी मैत्री केली. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला आपल्या जाळ्यात ओढले.
पीडित तरुण आरोपीला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने त्याला कारमध्ये दुसऱ्या ठिकाणी नेले. तिथं त्याच्यावर अश्लील व्हिडिओ शूट करत तो कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली. तसंच हा व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी 10 हजारांची खंडणी दिली.
( नक्की वाचा : लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकार, अन्यथा अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन! महिलेनं दिली नवऱ्याला धमकी )
पीडित तरुणाने पैसे दिल्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीनं पीडित तरुणाचा मोबाईल हिसकावला. त्यांनी गूगल पे आणि फोन पेवरुन रक्कम ट्रान्सफर केली. या प्रकरणात नांदेड सिटी पोलिसांनी रॉबिन उर्फ शुभम कांबळे याला अटक केलीय. पोलिसांनी या गुन्ह्यासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. आरोपीचा साथीदार ओंकार मंडलिक फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.
अकोलामध्येही घडला होता प्रकार
दरम्यान पुण्यासारखीच एक घटना काही दिवसांपूर्वी अकोलामध्येही उघड झाली होती. अकोल्यात बँकेच्या एका उच्च अधिकार्याचा अश्लील व्हिडिओ काढून दोघांनी फसवणूक केली होती. गे-डेटिंग" अॅपच्या माध्यमातून तो बँक अधिकारी त्या दोन तरुणांच्या अधिक जवळ आला. शिवाय तो त्या दोघां बरोबर व्हाट्सअपच्या माध्यमातून चॅटिंग ही करू लागला. त्यातून या तिघांची ही एकमेकां बरोबर जवळीक वाढली.
( नक्की वाचा: Akola: अकोल्यात ड्रग्जचं जाळं विणणारा 'गब्बर' फरार, पोलिसांवर पैसे उधळणाऱ्या आरोपीचा 'आका' कोण? )
बँकेच्या त्या अधिकाऱ्यांसोबत या दोघांनी सेक्स करतानाचे गुपचूप व्हिडिओ त्यावेळी काढले. हीच चुक त्या बँकेच्या उच्च अधिकाऱ्याला घातक ठरली. त्या दोन्ही आरोपींनी पुढे तो व्हिडीओ त्या बँक अधिकाऱ्याला पाठवला. शिवाय व्हायरल करण्याची धमकी ही दिली.
त्या दोघांनी बँक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. त्याच्याकडून 80 हजार रुपये उकळले. शेवटी या अधिकाऱ्याने खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आपल्या बरोबर झालेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. खदान पोलिसांनी मनीष नाईक आणि मयूर बागडे या दोघांना या प्रकरणी अटक केली.