
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Drugs Racket: अकोला पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद यासिन आणि मुश्ताक खान या दोन आरोपींना ताब्यात घेतलंय.. विशेष म्हणजे, अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
कशी उघड झाली घटना?
खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरात दुचाकीवरून दोन जण एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गौरक्षण रस्त्यावर सापळा रचला. संशयित दुचाकीस्वारांना थांबवून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर झडतीदरम्यान त्यांच्याकडे एमडी ड्रग्जचा साठा आढळून आला. त्याचं एकूण वजन 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅम असून, बाजारभावानुसार याची किंमत अंदाजे 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.
( नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या गब्बर जमादार अजूनही फरार आहे. त्यातच गब्बर जमादारचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत तो चक्क पोलिस अधिकाऱ्यांवर पैसे उधळताना दिसतोय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर गब्बरचे पोलीस आणि राजकीय नेत्यांसोबत लागेबांधे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अकोल्यात ड्रग्जचं जाळं पसरवणाऱ्या गब्बरचा आका कोण याचा शोध घेतला जातोय
कोण आहे गब्बर जमादार?
गब्बर जमादार अकोल्याच्या ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख असल्याचा संशय आहे. गब्बर वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जातंय. पोलीस मित्र म्हणूनही त्याची नियुक्ती होती. मात्र पोलिसांनी ही बाब फेटाळलीय. गब्बरचे पंचगव्हाण परिसरात अनेक अवैध धंदे आहेत. अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो आहेत. याच संबंधांमुळे गब्बरला कारवाईपासून संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला जातोय.
दरम्यान गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पक्षाने फेटाळलाय. गब्बर वंचितचा कार्यकर्ता नाही. नेत्यांसोबत कुणीही फोटो काढू शकतं, असं स्पष्टीकरण वंचितचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद इंगळे यांनी दिलं आहे.
गब्बरच्या राजकीय आणि पोलीस यंत्रणेशी जोडलेल्या संबंधांमुळे तपासाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे अकोल्यातील महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज जाळं विणणारे तस्कर आणि त्यांचे राजकीय आका कधी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world