राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik News : भोंदूबाबा अशोक खरात याचा पाय अधिक खोलात असल्याचं चित्र आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी वाढविण्यात आल्यानंतर आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
कल्पना खरात विरोधात शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार असल्याचं सांगितलं जात आहे. कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर असून कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे. एसआयटीचं पथक नाशिकमधील खरात याच्या घरी पोहोचलं आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
कल्पना खरातविरोधात गुन्हा दाखल, केव्हाही अटक होणार...
अशोक खरातवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू असताना आता त्याची पत्नी कल्पना खरातवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे अशोक खरात बरोबर त्याच्या पत्नीच्या देखील अडचणीत वाढल्याच दिसून येत आहे. 2023 मध्ये शिर्डीतील चार एकरचा भूखंड खरेदी प्रकरणी अशोक खरातनं व्याजानं मोठी रक्कम देऊन कोट्यवधीचा भूखंड गिळंकृत केल्याची फिर्याद मूळ मालक शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केली.
फसवणूक प्रकरणीत ५ जणांविरोधात गुन्हा...
या प्रकरणात अशोक खरातसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कॅप्टन अशोक एकनाथ खरात, कल्पना अशोक खरात, किरण नानासाहेब सोनवणे, अरविंद पांडुरंग बावके, अशोक परभत तांबे अशी आरोपींची नावं आहेत. तर यातील अटकेत असलेल्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणातील आरोपी अशोक खरात नाशिकमध्ये अटकेत असल्यामुळे तेथील तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला शिर्डी गुन्हा वर्ग केल जाईल, तसेच त्याची पत्नी कल्पना खरातला देखील ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.