राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri Viral News Today : चिपळूण शहरातील एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेला 33 वर्षीय तरुण कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण चिपळूण शहरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी या तरुणाने चार पानी पत्र लिहून बँकेतीलच काही कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे (33) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अलोरा गावातील रहिवासी आहे.
नेमकी घटना काय?
गुरुवारी दुपारपासून मुकुंद यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. ते कामावर गेले होते. परंतु, त्यानंतर ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा मोबाईलही बंद येत होता. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना मुकुंद यांनी लिहिलेले एक चार पानी पत्र सापडले. ज्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
नक्की वाचा >> Pune News: सिंहगड किल्ल्यावरून खाली येताना दोन पर्यटकांसोबत भयंकर घडलं, चार पथक घटनास्थळी पोहोचले अन्..
पत्रातील आरोप आणि गंभीर खुलासे
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद यांनी आपल्या पत्रात एचडीएफसी बँकेच्या चिपळूण शाखेतील चार कर्मचाऱ्यांची नावे घेतली आहेत. त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हे चारही जण बेपत्ता होण्याच्या किंवा टोकाच्या निर्णयाला पूर्णपणे जबाबदार आहेत. पत्रात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत: पत्रात आरोप करण्यात आले आहेत की, बँकेतील संबंधित सहकाऱ्यांकडून त्यांना गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला जात होता. त्यांना जाणीवपूर्वक ब्लॅकमेल केले जात होते.काही दिवसांपूर्वी त्यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक उल्लेखही या पत्रात आहे.
नक्की वाचा >> Trending Video: 'ती' वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्यांदाच गेली अन् व्हिडीओ बनवायची वेळ आली, सर्वच झाले थक्क
कोळकेवाडी परिसरात दुचाकी सापडली
मुकुंद बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. तपासादरम्यान, कोळकेवाडी परिसरात मुकुंद यांची दुचाकी मिळून आली. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्या परिसरात शोधमोहीम राठी केली आहे. कोळकेवाडी धरण आणि परिसरात बोटीच्या साहाय्यानेही त्यांचा शोध घेतला जात आहे, मात्र अद्याप त्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
शहरात उलटसुलट चर्चा
मुकुंद पालांडे यांच्यासारख्या सुशिक्षित आणि बँकेत कार्यरत असणाऱ्या तरुणावर अशा टोकाची भूमिका घेण्याची वेळ का आली, याची चर्चा शहरात रंगली आहे. पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत असून, पत्रात नमूद केलेल्या चारही जणांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.या घटनेमुळे पालांडे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.