मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीची शिक्षा कायम ठेवण्याचा आदेश दिला. डिसेंबर 2018 मध्ये घडलेल्या गुन्ह्यासाठी आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला दोषी ठरवण्यात आले असून त्याने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही लाजिरवाणी बाब आहे , असे म्हणत उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली. या माणसाने स्वत:च्या सासूवरच बलात्कार केला होता. पीडिता ही 55 वर्षांची असून तिला आपल्यासोबत असं काही होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्यापुढे सदर प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यांनी आदेश देताना म्हटले की आरोपी हा जावई असून पीडिता ही त्याची सासू आहे. आईच्या वयाच्या असलेल्या सासूसोबत असला प्रकार करणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आरोपीने पीडितेसोबत असलेल्या संबंधांचा गैरफायदा घेतल्याचेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे. सदर प्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावे हे पीडितेवर बलात्कार झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचेही न्यायमूर्तींनी नमूद केले आहे. आरोपीना सत्र न्यायालयाने 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून या शिक्षेला आव्हान देणारी याचिका त्याने उच्च न्यायालयात दाखल केली होती.
नक्की वाचा : उमेदवाराची गावातील मटण पार्टी बकऱ्यांवर उलटली; 6 ठार, 15 मृत्यूच्या दारात
प्रकरण नेमके काय आहे ?
पीडितेने म्हटले आहे की तिच्यावर अत्याचार करणारा तिचा जावई आणि त्याची बायको म्हणजेच पीडितेची मुलगी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. पीडितेची नातवंडे ही त्यांच्या बापासोबत राहात होती. ज्यादिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपी पीडितेच्या घरी गेला होता. त्याने सासूसोबत भांडण केलं आणि आमचा संसार पुन्हा जुळवून दे असे म्हणत वाद घातला. घाबरलेल्या सासूने त्याचे म्हणणे मान्य करत त्याच्यासोबत घरी येण्यास होकार दिला होता. घरी परतत असताना आरोपीने दारू प्यायली आणि पीडितेवर 3 वेळा बलात्कार केला. आरोपीने त्याच्या बचावात म्हटले होते की हे संबंध संमतीने ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्याचा युक्तिवाद अमान्य केला. जर हे संबंध संमतीने ठेवण्यात आले असते तर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केलीच नसती असे न्यायालयाने म्हटले होते.