समाधान कांबळे
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण येथे अडीच वर्षाच्या मुलीसह आईने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. औंढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा मुकाडे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. शुल्लक कारणावरून तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मात्र यात एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला आहे. घरघुती भांडणाचा फटका त्या चिमुकल्या लेकराला बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण इथं सीमा मुकाडे आपल्या कुटुंबा बरोबर राहात होत्या. ज्ञानेश्वर उर्फ भाऊराव मुकाडे यांच्या बरोबर त्यांचे लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षांची एक मुलगी ही होती. पत्नी सीमा मुकाडे यांचा त्यांच्या पतीबरोबर किरकोळ वाद झाला होता. त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. सीमा यांना पती मानसिक त्रास देत होता अशी ही माहिती समोर आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानचा मोठा डाव फसला, करायला गेले एक अन् झालं भलतचं
घरात वाद झाल्यानंतर सीमा यांनी विहीरीवर पाणी भरायला जाते असं घरी सांगितलं. जाताना त्यांनी सोबत आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला ही घेतलं. त्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेवून त्यांनी विहिरीत उडी घेतली. अडीच वर्षाच्या मुलीचं नाव आरती असं होतं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र आत्महत्या करताना त्या चिमुकल्या जिवाचा काय दोष असा प्रश्नही गावात विचारला जात आहे.
या संपूर्ण प्रकाराची औंढा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह विहीरी बाहेर काढले. या प्रकरणात संगिता रिठे यांच्या तक्रारीवरून सीमा यांचा पती आणि सासरा यांच्या विरोधात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोन्ही आरोपींना औंढा नागनाथ पोलिसांनी अटक देखील केली आहे. तर मायलेकीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.