जाहिरात

Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला

Sangamner Acid Attack: या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने विव्हळू लागली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला
Acid Attack: ती गावच्या रस्त्याने जात असताना अचानक एक अज्ञात युवक तिच्या समोर आला. (प्रतिकात्मक फोटो)
संगमनेर:

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

Acid Attack: शाळा सुटली, घरची ओढ लागली होती आणि चिमुकली पावले घराच्या दिशेने पडत होती. पण नियतीच्या मनात काहीतरी भलतंच होतं. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 वी मध्ये शिकणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय आहे प्रकरण?

वडगाव पान येथील शाळेत ही मुलगी 6 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळी लवकर भरतात. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ही मुलगी आपल्या घराच्या दिशेने निघाली होती. ती गावच्या रस्त्याने जात असताना अचानक एक अज्ञात युवक तिच्या समोर आला. काही समजण्याच्या आतच त्या तरुणाने या चिमुकलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले आणि तिथून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने विव्हळू लागली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : Pune News: ओळखीच्याच तिघांनी 15 वर्षांच्या मुलीला बनवलं शिकार, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार )

मुलीचा आवाज ऐकताच आसपासचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. मुलीच्या चेहऱ्याची गंभीर अवस्था पाहून तिला तातडीने लोणी येथील प्रवरा नगर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस सतर्क झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस कर्मचारी अमित महाजन आणि सचिन उगले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही पोलिसांनी हाती घेतले आहे.

पीडित मुलीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिचे वडील हयात नसून ती आपली आई आणि आजी-आजोबांसोबत राहते. तिची आई मोलमजुरी करून घराचा गाडा चालवते. अत्यंत गरिबीत शिक्षण घेणाऱ्या या मुलीवर असा अमानुष हल्ला कोणत्या कारणातून झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com