जाहिरात

Pune News: ओळखीच्याच तिघांनी 15 वर्षांच्या मुलीला बनवलं शिकार, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार

Pune News: पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

Pune News: ओळखीच्याच तिघांनी 15 वर्षांच्या मुलीला बनवलं शिकार, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार
Pune News : हा अत्याचार एकदाच झालेला नसून मागील 6 ते 7 महिन्यांपासून सुरू होता. (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News: पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षांच्या गतिमंद अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार हा संतापजनक प्रकार संबंधित सोसायटीतील क्लब हाऊसच्या स्वच्छतागृहात घडला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून ती मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा फायदा नराधमांनी घेतला. पीडितेच्या हतबलतेचा गैरफायदा घेत तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

विशेष म्हणजे आरोपी हे पीडित मुलीच्या ओळखीचे आणि नात्यातील असल्याचे समोर येत आहे. या संवेदनशील प्रकरणामुळे आणि ओळखीचेच लोक यात सामील असल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

( नक्की वाचा : पुण्याची ती मुस्लीम तरुणी आणि आणि इंजिनिअर भावाचा क्रूर अवतार; बहिणीचा काटा काढत आईला दिलं 'सरप्राईज'! )

 7 महिन्यांपासून सुरू होता छळ

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा अत्याचार एकदाच झालेला नसून मागील 6 ते 7 महिन्यांपासून सुरू होता. आरोपींनी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेसोबत हे घृणास्पद कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. इतक्या प्रदीर्घ काळापासून एका निष्पाप मुलीचा छळ सुरू होता, ही बाब समोर आल्यानंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागल्याने आणि काही संशयास्पद गोष्टी घडत असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबियांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी या संपूर्ण भयानक प्रकाराचा उलगडा झाला. मुलीने आपबिती सांगितल्यानंतर पालकांनी वेळ न घालवता तातडीने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाली करत गुन्हा दाखल केला आहे.

( नक्की वाचा : BJP MLA: मुंबईच्या बड्या भाजपा आमदाराला 'पीएमओ'चा दणका! पंतप्रधान मोदींनीच दिले मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश )

तिन्ही आरोपींना बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या नराधमांवर पोक्सो आणि सामूहिक बलात्काराच्या कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. 

पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींनी इतर कोणाला अशा प्रकारे त्रास दिला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. उच्चभ्रू वस्तीत अशा प्रकारचे कृत्य घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com