Delhi Seema Singh Murder Case: दिल्लीतील छावला नाल्यात 15 मार्च रोजी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाला बेडशिटमधे गुंडाळून नाल्यात फेकून नाल्यात फेकून देण्यात आले होते. हा मृतदेह सापडताच पोलिसांनी वेगानं तपास सुरु केला. पण, त्यांना कोणतंही यश मिळत नव्हतं. अखेर 15 दिवसानंतर पोलिसांना महिलेच्या नोजपिनमुळे महत्त्वाचा पुरावा सापडला. त्यामुळे तपास पुढे सरकला. या मर्डर मिस्ट्रीचं रहस्य उलगडताच पोलीस अधिकारी देखील चक्रावले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
छावला नाल्यामध्ये 15 मार्च रोजी ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता तिचं नाव सीमा सिंह आहे. त्या एका बड्या उद्योगपतींच्या पत्नी होत्या. त्यांचा दिल्ली-गुरुग्राममध्ये मोठा बंगला होता. तसंच अनेक ठिकाणी संपत्ती आहे. अतिशय हायप्रोफाईल आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबातील महिलेच्या हत्येचा जो खुलासा झाला तो देखील तितकाच धक्कादायक आहे.
मृतदेह सिमेंट आणि दगडाच्या पोत्यात फेकून दिला
सीमा सिंह यांची हत्या त्यांचे पती अनिल कुमारनेच केली, असं उघड झालं आहे. अनिल कुमारचा दिल्लीत व्यवसाय आहे. तो गुरुग्राममधील फार्म हाऊसमध्ये राहतात. त्यानं त्याची 47 वर्षांची पत्नी सीमाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह बेडशिटमध्ये गुंडाळला आणि नाल्यात फेकला. हा मृतदेह सिमेंट आणि दगडाच्या पोत्यात ठेवण्यात आला होता. नाल्यात टाकताच तो तळाशी जाईल आणि डंप होईल अशी अनिलची योजना होती.
( नक्की वाचा : High Court : 'तूच जबाबदार आहेस' बलात्कार पीडितेला कोर्टानं फटकारलं, आरोपीला दिला जामीन )
नोजपिनचं कनेक्शन काय?
या महिलेच्या मृतदेहाची ओळख 15 दिवस पटली नव्हती. पोलिसांनी बराच तपास केला. सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, पण काही फायदा होत नव्हता. अखेर महिलेच्या नोजपिनची चौकशी केल्यानंतर या तपासाला गती मिळाली. ही नोजपिन एका कंपनीच्या दक्षिण दिल्लीमधील आऊटलेटमधून खरेदी करण्यात आली होती. पोलिसांनी त्या आऊटलेटमध्ये चौकशी केल्यानंतर त्या महिलेचे नाव सीमा सिंह असून बिलिंगवरील नाव अनिल कुमार असल्याचं त्यांना समजलं.
पोलिसांनी अनिल कुमारला फोनवरुन साीमा सिंह कोण असल्याचं विचारलंय. त्यावर ती आपली पत्नी असल्याचं त्यानं सांगितलं. ती वृंदावनला फिरायला गेली असून तिच्याकडं मोबाईल नाही, असा दावा अनिलनं केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
अनिलच्या डायरीमध्ये मिळाला नंबर
पोलिसांनी अनिल कुमारच्या द्वारका ऑफिसमध्ये तपासणी केली. त्यावेळी त्यांना ऑफिसमधील एका डायरीत सीमाच्या आईचा नंबर मिळाला. त्यांनी सीमाच्या माहेरी संपर्क केला. त्यावर आमचं आणि सीमाचं 11 मार्चनंतर बोलणं झालेलं नाही, त्यामुळे आम्ही काळजीत आहोत, असं सीमाची बहीण बबीतानं सांगितलं.
दिल्ली पोलिसांना नाल्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिच्या माहेरच्या व्यक्तींना बोलावलं. त्यावेळी त्यांनी तो मृतदेह सीमाचा असल्याचं सांगितलं. सीमाच्या मोठ्या मुलानं देखील हा मृतदेह त्याच्या आईचा असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढं सुरु ठेवला. त्यांनी अखेर संशयाच्या आधारावर अनिलकुमारला अटक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात गुरुग्रामधील त्याच्या घराचा सुरक्षा रक्षक शिव शंकरलाही अटक करण्यात आली आहे. त्याचा या हत्येत किती सहभाग आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )
20 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
सीमाची हत्या गळा दाबून झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. सीमा आणि अनिलचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. त्यांचा मोठा मुलगा 17 तर लहान मुलगा 11 वर्षांचा आहे. अनिल त्याच्या आईसोबत गुरुग्राममधील फार्म हाऊसवर राहात होता. तर सीमा तिच्या मुलांबरोबर द्वारामधील बंगल्यात राहत होती. पोलीस या हत्येचा पुढील तपास करत आहेत.