Hyderabad Raidurg News : इच्छा असेल तर मार्ग सापडतो, न्याय मागण्यासाठी वयाचीही मर्यादा नसते. एका लहान मुलाच्या आग्रहामुळे अतिक्रमणाची सर्वात मोठी कारवाई झाली आहे. ही घटना हैद्राबादमधील रायदुर्गमध्ये घडली. शनिवारी रायदुर्गमध्ये बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आलं आणि तब्बल 39 एकर सरकारी जमीन पुन्हा मिळवण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाने हैद्राबाद आपत्ती व्यवस्थापन आणि मालमत्ता देखरेख संरक्षण एजन्सीकडे एक लिखित तक्रार दिली होती. यामध्ये रायदुर्गमधील एका मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली होती. या जागेवर एकेकाळी स्थानिक मुलांसाठी क्रिकेट खेळण्यासाठी मोठं मैदान होतं. मात्र या मैदानावर कुंपण घालून याचं रिअल इस्टेटमध्ये रुपांतर करण्यात येत होतं. याशिवाय मैदानाजवळील तलावात भराव टाकला जात होता.
नक्की वाचा - शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू, भाच्यानेही गमावला जीव; रायगडावर शोककळा
Hydraa च्या अधिकाऱ्यांनी तातडीने रायदुर्गमधील शक्तिपेठ मंडळामध्ये सर्वेक्षण सुरू केलं. या सर्वेक्षणातून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी लावलेल्या साइनबोर्डावर वादग्रस्त जमीन म्हणून स्पष्टपणे उल्लेख केला होता. मात्र तरीही नार्णे इस्टेटने स्वत:चा संपर्क क्रमांक, विक्रीसाठी भूखंडाचे मार्केटिंग असलेले फलक लावले होते. कोणतीही परवानगी नसताना येथील जमिनी विकल्या जात होता, असं Hydraa चे आयुक्त ए.व्ही.रंगनाथ म्हणाले. अखेर Hydraaकडून अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. पोलिसांनी नार्णे इस्टेटविरोधात बेकायदेशीरपणे जमीन हडपल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.