प्रथमेश गडकरी
वाशी सेक्टर-19 डी येथील सत्रा प्लाझामधील 'अलमो स्पा' या मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तिथे छापा टाकला. त्यानंतर पोलिसांच्या समोर जे काही आलं ते धक्कादायक होतं. या कारवाईत या स्पामध्ये वेश्याव्यवसायासाठी सहा महिलांना जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्यांची तिथून सुटका केली. शिवाय तिघा आरोपींना अटक करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, अलका पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे यांच्या पथकाने 17 मे रोजी सायंकाळी छापा टाकला होता. यासाठी पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. ज्यावेळी पोलिस ग्राहक बनून त्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांना तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलं.
छाप्यादरम्यान स्पा सेंटरमध्ये सहा महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी स्पा मालक अभिजीत मुतुकुमार नायडू (29), मॅनेजर प्रणाली गवसकर (34) आणि संजय उर्फ रेहमत इलाही शेख (42) या तिघांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मसाज सेंटर, स्पा सेंटर यांच्या नावा खाली अनेक ठिकाणी देहव्यापार केला जात आहे. कारवाईनंतर ही हे प्रकार सुरूच राहातात. वाशीमध्ये हा प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळे स्थानिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. अशा मसाज सेंटरवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे. शिवाय नवी मुंबई पोलिसांनी अशा अनैतिक धंद्यां विरोधात मोहिमच उघडावी अशी मागणी ही पुढे आली आहे.