देवा राखुंडे, प्रतिनिधी
उरणमधील यशश्री शिंदेंचं प्रकरण ताजं असताना इंदापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नववीत शिकणाऱ्या एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील एक कारकून मुलीवर जबरदस्ती करीत होता. याला विरोध केला म्हणून तिला जीवाला मुकावं लागलं. रविवारी 28 जुलै रोजी पुण्याच्या इंदापुरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील एक कारकून नजर ठेऊन होता. रविवारी तो थेट तिच्या घरी पोहोचला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत् केला. यावेळी मुलीने कारकूनास प्रतिकार केल्याने आरोपीने तिला कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर मुलीला तातडीने अकलूजमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज चौथ्या दिवशी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
उरणची घटना ताजी असताना आता इंदापूर तालुक्यात देखील थरकाप उडवणार प्रकार घडल्यानं मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रणजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी आरोपी विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, आरोपी रणजित जाधव याने आपल्या घरी येऊन अंगलट करण्याचा प्रयत्न केला. बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास आपण प्रतिकार केला आणि याच वेळी रणजीत जाधव याने आपल्याला कीटकनाशक पाजलं अशी तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे.
या मुलीच्या मृत्यूनंतर इंदापूर पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत का ? असा प्रश्न उपस्थित झालाय. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित मुलीनं स्वतः औषध प्राशन केल्याचं म्हटलं आहे. मात्र याच मुलीच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी संबंधित आरोपीने आपल्याला औषध पाजल्याचा गुन्हा यापूर्वीच दाखल केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला जातोय का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नक्की वाचा - यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडाला वेगळं वळण
इंदापूर तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत हा आरोपी कारकून असून पीडित विद्यार्थिनी त्याच शाळेत शिकत होती. आरोपीनं मुलीच्या घरी जाऊन हा प्रताप केला होता.पीडित मुलीवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती चिंताजनक होती.
इंदापूर पोलिसांनी कोणती फिर्याद दाखल केली होती?
इंदापूर पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन रणजीत जाधव या आरोपी विरोधात यापूर्वीच एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी रविवारी 28 जुलै रोजी मुलीच्या घरी गेला होता. 'तू मला आवडतेस, तुझ्यासोबत मला शरीरसंबंध ठेवायचे आहेत', असे म्हणत त्याने बळजबरीचा प्रयत्न केला. मात्र मुलीने या आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर मुलीच्या तक्रारीनुसार संबंधिक कारकुनाने आपल्याला कीटकनाशक पाजल्याची तक्रार 28 जुलै रोजी इंदापूर पोलिसात दाखल केली होती.