इंदापूरमधील भीमा नदी पात्रात बोट बुडाल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 40 तासांनंतर सहावा मृतदेह सापडला असून तपासकार्य थांबवण्यात आले आहे. यापैकी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील 20 जणांचा विविध ठिकाणी बुडून मृत्यू झाला आहे. इंदापूरातील भीमा नदीपात्रात सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत जाधव कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30 वर्षे ) हे पत्नी कोमल जाधव (वय 25 वर्षे ) आणि मुलगा शुभम (वय दीड वर्ष) आणि मुलगी माही (वय तीन वर्षे) यांना घेऊन पत्नीच्या माहेरी जात होते.
करमाळा तालुक्यातील कुगाव येथून सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील कळाशीच्या दिशेने एक बोट जात होती. मात्र वाऱ्याच्या प्रवाहापुढे बोट तग धरू शकली नाही आणि काही क्षणात बुडाली.
या दुर्घटनेत दीड वर्षांचा शुभम आणि तीन वर्षांच्या माहीचाही दुर्देवी मृत्यू झाला. यावेळी जाधव कुटुंबासह अनुराग उर्फ गोल्या न्यानदेव अवघडे (वय 20) हा बोट चालक आणि गौरव धनंजय डोंगरे (वय 25 वर्षे) यांचाही मृत्यू झाला. तब्बल 40 तासांनंतर या दुर्घटनेतील शेवटचा सहावा मृतदेह सापडला. या घटनेनंतर गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world