सुनिल दवंगे शिर्डी
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. यामध्ये पाकिस्तानच्या पाठिंब्यानं सुरु असलेले दहशतवादी तळ उडवण्यात आले. भारताच्या या कारवाईला पाकिस्ताननं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, भारतानं पाकिस्तानचे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा फायदा शिर्डीमधील एक भामटा घेत होता. जाकीर हुसेन युसूफ खान उर्फ ‘जग्गू इरानी (वय 30, राहणार श्रीरामपूर) असं या भामट्याचं नाव आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असल्याचं सांगून वयोवृद्धांची ‘तपासणी' करत, सोन्याचे दागिने, रोख रक्कम तो काढून घेत होता, अशी माहिती पोिलसांनी दिली आहे. शिर्डी पोलिसांनी त्याला अखेर अटक केलीय.
कसा सापडला जग्गू?
जाकीर हुसेनवर महाराष्ट्रसह विविध राज्यांमध्ये तब्बल वीस पेक्षा अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी दिली. शिर्डी शहरात एक व्यक्ती नव्या को-या नंबर नसलेल्या दुचाकीवरून फिरत स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगत वयोवृद्ध नागरिकांना अडवतोय, अशी माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीसांच्या पथकाने सापळा रचत जग्गू इरानीला ताब्यात घेतले.
( नक्की वाचा : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार )
आरोपी जाकीर हुसेनने यापूर्वीही अनेक वेळा पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करत नागरिकांची फसवणूक केली आहे, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट पोलीस ओळखपत्र, आणि नंबर नसलेली नवी पल्सर दुचाकी जप्त केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार आरोपी जग्गू इरानी अत्यंत चलाख असून त्याच्यावर विविध राज्यांत गुन्हे दाखल आहेत. बनावट पोलिस ओळखपत्र आणि संशयास्पद वाहनासह अटक केल्यानंतर अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी इतर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात येत आहे.
पोलिसांचं आवाहन
शिर्डी परिसरात कोणत्याही वयोवृद्धांची फसवणूक झाली असेल तर त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तक्रार द्यावी. त्याचबरोबर या पद्धतीने कुणालाही रस्त्यावर मौल्यवान वस्तू, पैसे देवू नये असं आवाहन शिर्डी पोलिसांनी केलं आहे.