Jalgaon News : संशयाच्या भुताने घेतला तरुणाचा बळी; भर मार्केटमधील थरारक घटनेने जळगाव शहर हादरले

केवळ संशयाच्या भुतामुळे एका तरुणाचा बळी गेल्याने जळगाव शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News : संशयाच्या भुताने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली आहे. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या रक्तरंजित हत्येमुळं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. जळगाव महापालिकेजवळील गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी एका तरुणावर चॉपरने सपासप वार करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संशयित शुभम सोनवणे याला पोलिसांनी अटक केली असून शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाच्या संशयातून हत्या 

जय हा जळगाव येथील देवकर महाविद्यालयात डिप्लोमा द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीसोबत त्याची मैत्री होती. मात्र, त्या मैत्रीवरूनच शुभम सोनवणे याच्या मनात संशयाचं विष पसरलं होतं. हा संशयच पुढे क्रूर हत्येचं कारण ठरला. बुधवारी दुपारी जय उर्फ साई गोराडे गोलाणी मार्केट परिसरात असताना शुभम सोनवणेने अचानक त्याच्यावर चॉपरने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जयला काहीच कळालं नाही. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. या घटनेमुळे बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. नागरिकांची धावपळ सुरू झाली.

नक्की वाचा - Buldhana News : झोपेतच पत्नीला संपवलं; 4 वर्षांच्या मुलाचीही सुटका नाही; स्वत:च्याच कुटुंबाचा भयंकर शेवट

पोलीस कर्मचाऱ्याची तत्परता, पण जीव वाचवू शकला नाही

या घटनेवेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रमेश चौधरी योगायोगाने तेथून जात होते. त्यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोर शुभमला पकडलं आणि आधी त्याच्या हातातील शस्त्र शिफातीनं काढून घेतली. यानंतर त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या जयला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

केवळ संशयाच्या भुतामुळे एका तरुणाचा बळी गेल्याने जळगाव शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भरदिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत असून हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीची पार्श्वभूमी याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article