
तेलंगणा जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नूने श्रीधर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठा खुलासा केला आहे. श्रीधर यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. त्यांची अब्जावधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी ACB ने श्रीधर आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित 13 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात एक आलिशान व्हिला, 19 प्राइम निवासी भूखंड, तीन स्वतंत्र इमारती, 16 एकर शेतजमीन, दोन अलिशान गाड्या, सोन्याचे दागिने आणि मोठी बँक ठेव रक्कम सापडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
करीमनगर येथील चोप्पडांडीमधील SRSP कॅम्पच्या डिव्हिजन क्रमांक 8 मध्ये तैनात असलेले नूने श्रीधर यांनी अवैध मार्गाने ही मालमत्ता जमा केली. ACB नुसार, या मालमत्तेचे बाजारमूल्य त्यांच्या नोंदणीकृत मूल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तपासात असेही समोर आले की, श्रीधर यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी थायलंडमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले. या शाही लग्नामुळे ACB चे लक्ष वेधले गेले. त्यानंतरच छापेमारी सुरू झाली.
श्रीधर यांचे नाव वादग्रस्त कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाशीही जोडले गेले आहे. हा जगातील सर्वात मोठा मल्टी-स्टेज लिफ्ट इरिगेशन प्रकल्प आहे. या प्रकल्पात आर्थिक अनियमिततांची चौकशी सुरू असून, श्रीधर यांची भूमिकाही संशयाच्या घेऱ्यात आहे. ACB ने त्यांच्या मलकपेट (हैदराबाद) येथील निवासस्थान, करीमनगरमधील कार्यालय आणि वारंगल व सिद्दीपेटमधील नातेवाईकांच्या घरावर शोधमोहीम राबवली. या दरम्यान, वित्तीय दस्तऐवज, मालमत्तेची कागदपत्रे आणि व्यवहाराचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत. सिंचन विभागाचे कंत्राट देताना त्यात काही भ्रष्टाचार झाला आहे का याचा ही आता तपास केला जात आहे.
ACB ने श्रीधर यांना करीमनगरमधून अटक करून हैदराबादला आणले आहे. तिथे त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना बुधवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, श्रीधर यांच्याकडे हैदराबादच्या शेखपेटमध्ये 4,500 चौरस फुटांचा एक प्रीमियम फ्लॅट, तेल्लापूरमध्ये एक आलिशान व्हिला, अमीरपेटमध्ये व्यावसायिक जागा आणि करीमनगरमध्ये हॉटेल व्यवसायातही हिस्सा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world