रुग्णालयात नेतो सांगून मालवाहू चालकाने तरुणाला जंगलात फेकलं; 2 दिवसांनी सापडला मृतदेह

जळगाव जामोद तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
जळगाव:

प्रतिनिधी, अमोल गावंडे

जळगाव जामोद तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मालवाहू  वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी नेतो असं सांगून चालकाने जखमीला जंगलातील दरीत टाकून दिल्याची घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत घडली.  परिणामी उपचाराअभावी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.   

जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील तरुण मन्साराम छत्तरसिंग वासकले हा 22 वर्षांचा तरुण  एका लग्नानिमित्त भिंगारा येथे गेला होता. मात्र लग्न आटोपल्यानंतर आपल्या दुचाकीने संध्याकाळी गावाकडे परत येत असताना निमखेडी ते सुनगाव रस्त्यावर त्याच्या दुचाकीला मालवाहू गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. यावेळी रस्त्यावर थांबलेल्या नागरिकांनी त्या जखमीला त्याच मालवाहू वाहनात टाकून रुग्णालयात नेण्यास सांगितले.

नक्की वाचा - कोपर्डीमध्ये दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल

मात्र मालवाहू चालकाने पुढे गेल्यावर जखमी मन्साराम वासकले याला  जंगलातील दरीत फेकून दिले. घरच्यांनी शोध घेतला असता आणि पोलिसांत तक्रार दिल्यावर दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह जंगलात आढळला.  उपचार अभावी त्याचा मृत्यू होऊ शकतो याचा विचारही गाडी चालक योगेश महाजन याने केला नाही. अशी अमानवीय कृती करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement