
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा राज्यात अस्तित्वात आहे. असं असलं तरी त्याचा धाक कुणाला आहे असं वाटत नाही. त्यामुळेच अनेक जण हे अंधश्रद्धेला बळी पडतात. अशीच एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घडली आहे. भोकरदन तालुक्यातील वाळसा-वडाळा गावातील ज्ञानेश्वर भिका आहेर या 30 वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पण त्याने आत्महत्या का केली याचे कोडे 10 दिवसानंतर उलगडले. त्यावेळी चौकशीत जी काही माहिती समोर आली त्यामुळे सर्वच जण हादरून गेले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्ञानेश्वर आहेर हे आपल्या पत्नी आणि मुलीसह वाळसा-वडाळा या गावात राहात होते. ते एक दिवस पत्नी अंजना आहेर आणि मुलीसोबत बुलढाणा जिल्ह्यातील चामनगाव (धाड) या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची ओळख एका भोंदूबाबा बरोबर झाली. गणेश दामोदर लोखंडे असं या भोंदूबाबाचे नाव होते. या ओळखीतून भोंदूबाबाने पत्नी अंजना आहेर यांचा मोबाईलनंबर मिळवला. त्यांच्यावर वाईट नजर टाकू लागला. फोन आणि चिट्ठी पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली.
त्याच बरोबर वारंवार ज्ञानेश्वर याला फोन करून त्याला त्रास देण्यास सुरूवात केली. शिवाय तुझी मुलगी ईश्वरी ही माझीच आहे. ईश्वरी मला पाहीजे. नाहीतर मी तुमच्यावर 05 से 10 लाखाचा मानहानीचा दावा दाखल करेन अशी धमकी ही तो देत होता. सतत दिला जाणारा त्रास आणि बदनामी होईल या भीतीने ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आत्महत्ये सारखं पाऊल उचललं.
आरोपी भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याला गुप्तधनासाठी नरबळी द्यायचा होता. त्यासाठी त्याला पायाळू मुलगी हवी होती. त्यासाठी त्यानं ज्ञानेश्वर यांच्याकडे त्यांची मुलगी ईश्वरी हिची मागणी केली होती. मात्र त्याला पती पत्नीनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. या बाबाने एका वकीला मार्फत या पती पत्नीला सहा लाखाची नोटीस ही बजावली होती. या भोंदूबाबाने नरबळीसाठी खड्डा ही करून ठेवल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीत समोर आली आहे.
पती पत्नीला सतत ब्लॅकमेल केले जात होते. त्याला घाबरुन ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याचं ही तपासात उघड झालं आहे. नरबळी देण्यासाठी मुलीची मागणी करून आत्महत्यास प्रवृत केल्या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा गणेश दामोदर लोखंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्याला अटक ही केली आहे. या प्रकरणी बाबा सोबत आणखी कोण होतं का? याचा ही तपास पोलिसांडून केला जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबल उडाली आहे.