लक्ष्मण सोळुंके, जालना:
Jalna Crime: रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना जालन्यात उघडकीस आली आहे. सख्ख्या भाचीचे रक्षण करण्याऐवजी, सख्या मामानेच तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या कृत्यात आरोपीच्या पत्नीने म्हणजेच मामीनेही साथ दिल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कदीम जालना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.
मामानेच केला भाचीवर अत्याचार..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईचा हिंगोली येथील व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र, कौटुंबिक वादातून काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आईने दुसरे लग्न केल्यामुळे पीडित मुलगी जालन्यात आपल्या मामाकडे राहण्यास आली होती. मात्र, ज्या मामाच्या आश्रयाला ती आली होती, तोच तिचा वैरी बनला.
आरोपी मामा दारूच्या नशेत गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. या छळात त्याला त्याच्या पत्नीचीही साथ मिळत होती. अखेर या जाचाला कंटाळून मुलीने मामाच्या घरातून पळ काढला आणि हिंगोली येथे आपल्या वडिलांचे घर गाठले. तिथे तिने आजीला आपली आपबिती सांगितली. आजीने तात्काळ मुलीला घेऊन जालना गाठले आणि पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
या तक्रारीनंतर कदीम जालना पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी मामाला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास 'पिंक पथक' करत आहे. दरम्यान, आई वडील सांभाळत नसल्याने आश्रयाला आलेल्या भाचीवर मामानेच अत्याचार केल्याच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.