लक्ष्मण सोळुंखे
Jalna Commissioner Santosh Khandekar Arrested by ACB: जालना नगर परिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत नुकतेच करण्यात आले आहे. या महापालिकेचा कारभारही सुरू झाला आहे. मात्र याच महापालिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महापालिकेच्या आयुक्तांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या दालनातच ही लाच घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर आयुक्तांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेण्यात आले आहे. आयुक्तांच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. चौकशीनंतर जालना महापालिकेच्या आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जालना महापालिकेच्या इमारतीच्या कामासाठी लाच
संतोष खांडेकर हे जालना महापालिकेचे आयुक्त आहेत. जालना नगर परिषदेतही त्यांनी मुख्यधिकारी म्हणून काम पाहिले आहे. बढती मिळाल्यानंतर त्यांची नियुक्ती जालना महापालिका आयुक्तपदी झाली. जालना महापालिकेच्या इमारतीचे काम सध्या सुरू आहे. एका ठेकेदाराला हे काम देण्यासाठी खांडेकर यांनी एक कोटींची लाच मागितल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या लाचेचा पहिला हफ्ता म्हणून 10 लाख रूपये देण्याचं निश्चित झालं होतं.
ऑफिसमधूनचं घेतलं ताब्यात
त्यानुसार हा पहिला 10 लाखांचा हफ्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. एसीबीच्या दुसऱ्या पथकाकडून आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती देखील घेण्यात आली. आयुक्त संतोष खांडेकर यांनी महानगरपालिका गुत्तेदाराकडून दहा लाखाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी, जालना महानगरपालिकेच्या दालनातूनच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले गेले. या प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत विभागाचे पथक करत आहे.
महापालिकेच्या आयुक्तांनाच लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. तेव्हापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. शिवाय त्यांच्या निवासस्थानाचीही झडती घेतली जात असल्याचं समोर आलं आहे.