
मेहबूब जमादार
कल्पनाही करू शकणार नाही असा खूनाचा कट. त्यानंतर पुढच्या चोवीस तासात झालेला हत्येचा उलगडा. यामुळे रायगड जिल्हा हादरून गेला आहे. हे भयंकर प्रकरण रायगड जिल्ह्यातील नागोठणे इथे घडले आहे. या प्रकरणात 19 वर्षीय विवाहीतेने आपल्याच पतीचा असा काही हत्येचा कट रचला की पोलीस ही हैराण झाले आहेत. या खूनला अनैतिक संबंधाची किनार होती. शिवाय सोशल मीडियाचा आधार ही घेण्यात आला होता. पण आरोपी कितीही चतूर आणि हुशार असले तरी पोलीस नेहमीच त्यांच्या दोन पावले पुढे असतात हे या प्रकणातील उलगड्यावरून दिसून आले आहे. हे हादरवून टाकणारे संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेणार आहोत. दिपाली अशोक निरगुडे ही 19 वर्षाची तरुणी. ही मुळची पेणची राहाणारी होती. तिचे लग्न कृष्णा नामदेव खंडवी याच्यासोबत झाले होते. त्याचे वय 23 वर्ष होते. दिपाली ही फेसबूकवर अॅक्टीव्ह होती. या माध्यमातून तिची ओळख नाशिकचा असलेल्या उमेश सदु महाकाळ याच्या सोबत झाली.त्याचं वय ही 21 वर्ष आहे. ही ओळख पुढे प्रेमात झाली. आता या दोघांनाही एकत्र यायचे होते. पण पती कृष्णाचा अडथळा होता. तिला त्याच्या सोबत राहायचे नव्हते. त्यामुळे दिपाली आणि उमेश यांनी मिळून एक कट रचला. हा कट अत्यंत खतरनाक आणि भयंकर होता. कुणाला शंका येणार नाही आणि वाटेतला काटा ही निघून जाईल अशी आखणी या दोघांनी केली.
त्यासाठी प्रियकर उमेशने त्याची मैत्रिण 19 वर्षाच्या सुप्रिया चौधरी हिची मदत घेतली. सुप्रियाने इंस्टाग्रामवर एक फेक अकाऊंट तयार केले. त्या माध्यमातून तिने दिपालीचा नवरा कृष्णा याच्याशी संपर्क केला. त्याच्या सोबत चॅटींग सुरू केली. नंतर वॉट्सअप कॉल, मोबाईल कॉल, व्हिडीओ कॉल सुरू झाले. कृष्णाला सुप्रियाने भेटण्यास सांगितले. मी नागोठण्याला येणार आहे. तू आम्हाला बस स्टॉपवर भेट असं तिने सांगितले. कृष्णाही त्यासाठी तयार झाला. हे सर्व दिपाली आणि उमेश यांनी ठरवलेल्या प्लॅनचा भाग होता. ठरल्या प्रमाणे 10 ऑक्टोबरला सुप्रिया आणि उमेश हे दोघे ही नागोठण्याला पोहोचले. हा दिवस ही मुद्दामुन निवडण्यात आला होता. कारण त्याच दिवशी दिपालीची परिक्षा होता. ती माणगावला गेली होती. त्यामुळे तिने या सगळ्या पासून आपण कसे नामानिराळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
दिपाली परिक्षेसाठी माणगावला गेली. त्याच वेळी तिचा प्रियकर उमेश आणि त्याची मैत्रिण सुप्रिया हे नागोठण्याला पोहोचले. त्यांनी कृष्णाशी संपर्क केला. कृष्णा ही काही वेळात बस स्टँडवर आला. त्यानंतर ते गायब झाले. कृष्णाचा थांब पत्ता लागला नाही. सगळीकडे शोधाशोध झाली. तरीही तो सापडला नाही. शेवटी कृ्ष्णाच्या वडीलांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. मुलगा हरवला असल्याची तक्रार दिली. पोलीसांनी ही तातडीने कारवाई करत आपली सुत्र हलवली. सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या पथकासह या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यांच्या हाती एक सीसीटीव्ही लागले. त्यात त्यांना उमेश, कृष्णा आणि सुप्रिया हे एकाच बाईकवरून जाताना दिसले. हा पोलीसांच्या हाती लागलेला पहिला छडा होता. त्यानंतर पोलीसांनी त्यांचे कृष्णाचे मोबाईल डिटेल्स तपासले.
त्याच्या मोबाईल डिटेल्सवरून कृष्णा हा उमेश आणि सुप्रियाच्या संपर्कात होता. पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण करत उमेश आणि सुप्रिया यांना नाशिक मधून अटक केली. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी धक्कादायक खुलासा केला. नागोठणे एसटी स्टँडवर भेटल्यावर ते तिघे ही जवळच्या जंगलात गेले. त्या आधी उमेशने एक स्कार्प आणि रुमाल विकत घेतला. तर कृष्णाला त्याने मास्क घालण्यासाठी सांगितले. त्यानंतर ते वासगावच्या जंगलात गेले. तिथे ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. आरोपीने इतक्यावरच न थांबता मृताच्या उजव्या पायातल्या बूटाची लेस काढून त्याच्या गळ्याभोवती आवळली. शिवाय ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले. मोबाईल फोडून नागोठणे पाली रोडला फेकून दिल्याची कबूली आरोपींनी दिली.
या संपूर्ण षडयंत्रात कृष्णाची पत्नी दिपाली ही मास्टर माईंड होती असं तिचा प्रियकर उमेश आणि मैत्रिण सुप्रिया हीने चौकशीत सांगितले. ज्यावेळी पतीचा खून केला जात होता त्यावेळी दिपाली सतत उमेशच्या संपर्कात होती. शिवाय काय झालं आहे याचे अपडेट वारंवार घेत होती. खून झाल्यानंतर ही ती घरी अतिशय सहजपणे वावरत होती. जणू काही घडलेच नाही असं दाखवत होती. शिवाय घरात काय सुरू आहे याची अपडेट ती उमेशला नाशिकला देत होती. खून करून तो नाशिकला पळाला होता. चौकशीत ही बाब ही समोर आली. त्यानंतर पोलीसांनी दिपालीला ही अटक केली आहेत. आता हे तिघे ही पोलीसांच्या ताब्यात आहेत. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. प्रेमात अडथळा येत असल्याने दिपालीने प्रियकर उमेश सोबत षडयंत्र रचून त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कुलकर्णी (सहायक पोलीस निरीक्षक) यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world