Jhund Actor Murder: नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'झुंड' (Jhund) या चित्रपटात काम केलेला अभिनेता प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या नारा परिसरात ही घटना घडली असून, दारूच्या नशेत झालेल्या जोरदार वादानंतर त्याच्या मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून त्याला संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, अभिनयात चमकलेल्या प्रियांशूची पोलिस रेकॉर्डवर कुख्यात गुन्हेगार म्हणूनही नोंद होती.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी प्रियांशू क्षत्रिय आणि त्याचा मित्र ध्रुव साहू यांच्यात दारूच्या नशेत जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित आरोपी ध्रुव साहू याने प्रियांशूवर धारदार शस्त्राने अनेक वार केले.
या घटनेनंतर उशिरा रात्री उत्तर नागपूरच्या नारा परिसरात प्रियांशू जबर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना बाबू छत्री अर्धनग्न अवस्थेत आणि प्लॅस्टिकच्या वायरने (तारेने) बांधलेल्या स्थितीत आढळून आला. शरीरावर तीक्ष्ण शस्त्रांच्या अनेक जखमा होत्या. स्थानिकांना त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
( नक्की वाचा : बीड कारागृहात कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव? शिवाजी महाराजांची मूर्तीही हटवली, बड्या अधिकाऱ्यावर आरोप )
'बाबू छत्री' नाव कसे पडले?
प्रियांशू क्षत्रिय याला परिसरामध्ये बाबू छत्री या नावाने ओळखले जात होते. यापूर्वी त्याने नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक छोटी, विनोदी भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे त्याचे नाव बाबू छत्री असे पडले होते.
प्रियांशू अभिनयात चमकला असला तरी पोलिस रेकॉर्डवर असलेला कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर चोरी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अशा गुन्हेगाराला 'झुंड'मध्ये काम मिळाल्याने त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
या घटनेनंतर जरीपटका पोलिसांनी संशयित आरोपी ध्रुव साहू याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. या हत्येमागे नेमके कोणते कारण होते, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.