
आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असून, त्याकरिता त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप बंदिवान कैद्यांचे वकील ॲडव्होकेट राहुल आघाव यांनी केला आहे. या आरोपांमुळे बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नेमका आरोप काय आहे?
ॲडव्होकेट राहुल आघाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पक्षकार असलेले चार कैदी -तीन हिंदू आणि एक मुस्लिम यांनी लेखी तक्रार केली आहे. या कैद्यांमध्ये अमोल सुखदेव भावले, महेश नामदेव रोडे, आणि मोहसीन सरदार पठाण यांचा समावेश आहे. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे त्यांच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणत आहेत.
धर्मांतर करण्यास नकार दिल्यास, कैद्यांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत आहे. या छळामुळे कारागृहात सध्या दहशतीचे वातावरण असल्याचा दावा ॲड. आघाव यांनी केला आहे.
या गंभीर प्रकरणाविरोधात ते लवकरच उच्च न्यायालयात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याविरुद्ध याचिका दाखल करणार आहेत. ॲड. आघाव यांनी राज्य सरकार आणि महासंचालकांकडे या प्रकरणाचा तपास करून योग्य कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
आमदार पडळकरांनीही केला होता आरोप
बीड कारागृहातील हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वी तक्रार केली होती. माध्यमांशी बोलताना आमदार पडळकर यांनी सांगितलं की, 'तुरुंगाधिकारी पेट्रस जोसेफ गायकवाड हे धर्मांतराचे काम करत आहेत. कारागृहातील छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, आणि गणपतीची मूर्ती मूळ जागेवरून काढून टाकण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटोही हलवण्यात आले आहेत.
कारागृहात बायबलमधील घोषवाक्य लिहिली गेली आहेत. कैद्यांनी नियमितपणे करत असलेले वारकरी संप्रदायानुसार भजन-कीर्तन बंद पाडले आहे. सर्व कैद्यांनी धर्मांतर करावे, असा दबाव अधिकाऱ्यांकडून टाकला जातो. एक पाद्री तुरुंगाधिकाऱ्यांना आठवड्यातून 1-2 वेळा भेटायला येतो, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे, असा आरोप पडाळकर यांनी केला.
पडळकर यांनीही मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाचा तपास करून संबंधित तुरुंगाधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world