लग्न सभारंभ आटोपून घरी येत असताना भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. घटनेच्या विरोधात कल्याणमधील भाजप आक्रमक झाली आहे. 12 तासांच्या आत आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी पोलिसांना दिला आहे.
नक्की वाचा - Kalyan Marathi Man Attack: यांचा माज कधी उतरणार? आधी घाणेरडे चाळे मग मराठी कुटुंबाला मारहाण
कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात राहणारे हेमंत परांजपे एक लग्न सभारंभ आटोपून रात्री घरी परतत होते. त्यांच्या इमारतीजवळ ते काही वेळेकरिता उभे होते. त्याचवेळी दोन अज्ञात तरुण एका स्कूटीवरुन आले. त्यांच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता. 'काय रे आमच्या दादांना शिव्या देतो' असं म्हणत हेमंत परांजपे यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. परांजेप यांनी या प्रकरणात कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा - Kalyan News : जज साहेब मला मोकळे करा, आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेनं भिरकावली चप्पल
परांजपे हे जनसंघापासून भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याने कल्याण डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. घटनेच्या विरोधात कल्याण भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप कार्यकर्तयांनी कल्याण पश्चिमेतील आहिल्याबाई चौकात भाजप कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. हाताला काळ्या फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. परांजपे यांच्यावर हल्ला करणारे कोण आहेत? त्यांचा शोध घेण्यात यावा. या घटनेचा सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध तत्काळ घेतला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे. पोलिसांनी अद्याप तरी आरोपींना अटक केलेली नाही. येत्या 12 तासांच्या आत आरोपींना अटक केलेली नाही. लवकर आरोपीला अटक केली नाही तर भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष पाटील यांनी पोलिसांना दिला आहे.