कल्याण: हनिमूनला जाण्यावरुन झालेल्या वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या हल्ल्यामध्ये जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ईबाद फालके असे जावयाचे नाव असून जकी खोटाल असे हल्लेखोर सासऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनिमूनला जाण्यावरुन सासरा आणि जावयामध्ये वाद झाला, त्यानंतर सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हनिमूनला कुठे जायचे? यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात आहे. मुलगी आणि जावयाने प्रार्थनेसाठी मक्का मदिनेला जावे अशी जकी खोटाल यांची इच्छा होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तर जावई ईबाद फालके याने आम्ही काश्मिरला जाणार असे सांगितले होते. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला आणि सासऱ्याने जावयावर थेट ॲसिडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर सासरा फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे कल्याणमध्ये एका हाय प्रोफाईल सोसायटीत किरकोळ वादातून लोखंडी रॉडने जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील योगिधाम येथील अजमेरा हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीत धूप लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला.
नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले .या हाणामारीत लोखंडी रोडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिजीत देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर विजय कळविकटे ,धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत . या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने दहा ते पंधरा तरुणांना बोलवून मारहाण केल्याच्या आरोप झाला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नक्की वाचा - एसटीचं नवं उड्डाण! विमानाप्रमाणे बसमध्येही प्रवाशांचं स्वागत करणार 'सुंदरी'