अमजद खान, प्रतिनिधी
अल्पवयीन मुलगी अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या 3 भावांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आकाश गवळी, श्याम गवळी आणि नवनाथ गवळी अशी तडीपार करण्यात आलेलेल्यांची नावेआहेत. या तिघांनाही ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी ही कारवाई केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
अल्पवयीन मुलगीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळीस त्याची पत्नी साक्षी या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्याला दोन वेळा पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी आणि त्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी दिली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालविला जाणार आहे. आरोपी गवळीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांसह विविध सामाजिक संस्थांनी केली आहे.
आरोपी गवळीच्या घराशेजारीच पीडित मुलगी राहत होती. तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली. तिचा मृतदेह एका बॅगेत भरुन बापगावनजीक फेकून दिला. त्याने ज्या बॅगेत मृतदेह फेकला. ती बॅग पोलिसांना मिळून आली नाही. मात्र त्याने त्याचा मोबाईल बुलढाण्यातील एका लॉज मालकाला विकला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला. हा मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या तपासाकरीता पाठिविला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी गवळी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावला पसार झाला होता. त्याला पोलिसांनी शेगाव येथून अटक केली.
( नक्की वाचा : मेव्हण्याला अडकवण्यासाठी वकिलाने केला महिलेचा वापर, बदलापूरमधील भयंकर घटना )
आरोपी गवळीच्या वडिलांचा व्याजी पैसे देण्याचा धंदा आहे. गवळीला दारु आणि गांजा पिण्याचे व्यसन आहे. त्याच्या घराशेजारीच त्याने पत्र्याची शेड उभारली होती. त्या शेडमध्ये तो गांजा विक्री करायचा. आरोपी गवळी राहत असलेली इमारत धोकादायक असल्याने ती पाडण्याची मागणी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यानी केली आहे. त्यानुसार महापालिकेकडून कार्यवाही सुरु आहे. आरोपी गवळी याच्या घरच्या मंडळींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. त्यानुसार आरोपी गवळी याच्या तीन भावांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.