निनाद करमरकर, प्रतिनिधी
बदलापुरात एका महिलेने आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात वेगळंच सत्य समोर आलं असून आपल्या मेव्हण्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उल्हासनगरातील एका वकिलाने हा सगळा कट रचल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर कट रचणारा वकील आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला फरार झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उल्हासनगरातील वकील सन्नी चौहान याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र यामध्ये आपल्या पत्नीला तिचा भाऊ अभिषेक सिंग याची फूस असल्याचा संशय आणि राग सन्नी चौहान याला होता. त्यामुळेच त्याने अभिषेक सिंगला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला. त्यानुसार उल्हासनगरातील एका महिलेला त्याने आपल्या कटात सामील करून घेतलं.
हा कट पूर्ण करण्यासाठी प्रथमेश यादव नामक तरुणाने अभिषेक सिंगच्या नावाने स्नॅपचॅट अकाऊंट उघडत त्यावरून संबंधित महिलेशी चॅटिंग केली आणि तिला ३० डिसेंबर नोकरीच्या मुलाखतीसाठी बदलापूरच्या लॉजवर येण्यास सांगितलं. ३० डिसेंबर रोजी सन्नी चौहानने त्याचा मित्र भावेश तोतलानी याला अभिषेक सिंग नावाने बनावट आधार कार्ड तयार करून देत बदलापूरच्या एका लॉजवर पाठवलं. तिथे कटात सहभागी असणारी महिला नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने गेली आणि काही वेळाने लॉजमधून निघून तिने थेट बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जात अभिषेक सिंग यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अभिषेक सिंग याचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलिसांची टीम दुसऱ्याच दिवशी लखनऊला रवाना झाली. मात्र अभिषेक याने आपण मागील काही दिवसांपासून लखनऊमध्येच असून त्याचे सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवले. त्यामुळे हे प्रकरण वेगळं असल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाचा उलट्या दिशेने तपास सुरू केला.
( नक्की वाचा : Saif Ali Khan Attacked: सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी पाहा Exclusive Video )
लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीने अभिषेक सिंग या नावाचं आधार कार्ड जरी दिलं असलं, तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा त्याचा चेहरा मात्र अभिषेक याचा नसल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याचा शोध घेऊन पोलिसांनी अभिषेकच्या नावाने लॉजमध्ये गेलेल्या भावेश तोतलानीला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने हा सगळा कट अभिषेक सिंग याच्या बहिणीचा पती वकील सन्नी चौहान याने रचल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या भावेश तोतलानी आणि प्रथमेश यादव या दोघांना अटक केली. दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईचा सुगावा लागताच वकील सन्नी चौहान आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला हे दोघेही फरार झालेत. या दोघांचा आता पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world