Kalyan News: कल्याणमधील उंबर्डे परिसरात एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले असून, पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याने थेट नाशिक गाठले. 'मी माझ्या पत्नीला मारून आलो आहे, असे शब्द जेव्हा या आरोपीने नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात उच्चारले, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. या घटनेमुळे कल्याण आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भुतकर आणि अर्चना भुतकर या पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून खटके उडत होते. विशाल हा अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता, ज्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. या वादातूनच विशाल कल्याणमधील उंबर्डे भागात अर्चना जिथे राहत होती, त्या घरी पोहोचला. तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात विशालने अर्चनाचा गळा आवळून तिचा जीव घेतला. हत्येनंतर आरोपी विशालने तिथून पळ काढला आणि तो थेट नाशिकला आपल्या भावाकडे गेला.
नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर विशालने आपल्या भावाला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला घेऊन नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोहोचला. माझा भाऊ काय सांगतोय ते नीट ऐका, असे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले. जेव्हा विशालने आपण पत्नीची हत्या करून आल्याची कबुली दिली, तेव्हा पोलिसांना सुरुवातीला विश्वास बसला नाही.
( नक्की वाचा : Vasai News : मासे खाताय की विष? वसईतील विक्रेत्याचा अघोरी प्रकार उघड; नागरिकांच्या जिवाशी थेट खेळ, पाहा VIDEO )
विशालने दिलेली माहिती खरी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी नाशिक पोलिसांनी तातडीने कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि त्यांना संबंधित पत्त्यावर जाऊन पाहण्यास सांगितले.
खडकपाडा पोलिसांचे पथक तात्काळ उंबर्डे येथील विशालने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. तिथे घरात प्रवेश केल्यावर पोलिसांना अर्चना भुतकर यांचा मृतदेह आढळून आला. या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी विशालला ताब्यात घेतले आहे. विशाल आणि अर्चना यांना दोन मुले असून, वादामुळे एक मुलगा विशालकडे तर दुसरा मुलगा अर्चनाच्या आईकडे राहत होता.
( नक्की वाचा : KDMC News: कल्याण डोंबिवलीत महायुतीमध्ये संघर्ष पेटला, भाजपाच्या एका ठरावानं शिवसेनेची झोप उडवली! )
या दुर्दैवी घटनेमुळे दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरपले आहे. खडकपाडा पोलिसांचे एक पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी नाशिकला रवाना झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.